मद्यप्राषन करून धांगडधिंगा घालणाऱ्यांना चाप लावण्यासाठी तब्बल हजारो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार राहणार आहे. प्रत्येक चौकात नाकाबंदी, मद्यपी वाहनचालकांची ‘ब्रेथ अ‍ॅनालाईझर’द्वारे तपासणी, आरडाओरड करणाऱ्यांवर कारवाई, मद्यविक्रेत्यांवर करडी पाळत, पोलीस पथकाद्वारे गस्त या स्वरुपाचा बंदोबस्त नववर्षांच्या पूर्वसंध्येला तैनात राहणार आहे.
गतवर्षांला निरोप आणि नववर्षांचे स्वागत मद्यपान करून करण्याची प्रथा चांगलीच रुढ झाली आहे. अतिउत्साहाच्या नादात या दिवशी काही अनेक अनुचित प्रकार घडत असल्याचा अनुभव आहे. शहरातील काही विशिष्ट भागात मद्यपींचा धुडगूस ठरलेला असतो. कॉलेज रोड व गंगापूर रस्ते हे त्याचे प्रातनिधिक उदाहरण. महाविद्यालयांच्या परिसरात या दिवशी प्रचंड गोंधळ असतो. या पाश्र्वभूमीवर, नववर्षांच्या स्वागताला नागरिकांच्या बरोबरीने पोलीस दलही सज्ज झाले आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी सायंकाळपासून शहरातील चौकाचौकात वेगवेगळ्या स्वरुपाचा पोलीस बंदोबस्त तैनात राहील. त्यात ३ पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, ६१ पोलीस निरीक्षक, ७८ सहाय्यक निरीक्षक, १२१ उपनिरीक्षक, २००० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी, २६५ नवप्रविष्ठ शिपाई यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांच्या मदतीला ५०० महिला व पुरुष गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तावर राहतील. साध्या वेशातील पुरुष व महिला पोलिसांच्या पथकांद्वारे गस्त घातली जाणार असल्याचे उपायुक्त संदीप दिवाण यांनी सांगितले. नववर्षांचे स्वागत करताना आपल्या उत्साहामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत, रस्त्यावर वाहनांचे हॉर्न वाजविणे, आरडाओरड करून शांतताप्रिय नागरिकांना त्रास होईल असे वर्तन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना घराचे दरवाजे, खिडक्या सुरक्षितपणे बंद कराव्यात. घरातील दिवे सुरु ठेवावेत. आपल्या शेजारील नागरिकांना घराकडे लक्ष देण्याबाबत सूचित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तुंना हात लावू नये, दुकानदार व हॉटेलचालकांनी संशयास्पद वाहने उभी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सीसी टीव्ही कॅमेरे सुस्थितीत असतील याची खात्री करावी, असे आवाहन केले आहे.