ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला आहे किंवा रस्त्यावर बेवारस बॅग पडली आहे, असे निनावी दूरध्वनी पोलिसांना येतात. कसलाही धोका नको म्हणून पोलीस संपूर्ण तपासणी करतात आणि ती निव्वळ अफवा असल्याचे निष्पन्न होते. परंतु गेल्या काही महिन्यांत वैयक्तिक फायद्यासाठी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना कामाला लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ठाण्याच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात अतिरेकी घुसल्याची खोटी महिती दिल्याचे त्यातील ताजे उदाहरण!
ठाण्याच्या तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळील पडीक इमारतीत काही तरूण घुसल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलिसांनी दिली. या तरुणांच्या पाठीवर मोठय़ा बॅगा होत्या. ते दहशतवादी असावेत, अशी शक्यता त्याने व्यक्त केली आणि स्थानिक पोलिसांसह, कमांडो आणि राज्याचा दहशतवादविरोधी विभाग कामाला लागला. मात्र संशयास्पद अतिरेकी सापडले नाहीत. या घटनेची चौकशी केल्यानंतर जे सत्य समोर आले ते पोलिसांना धक्कादायक होते. दुर्गाप्रसाद या सुरक्षारक्षकाने पोलिसांना माहिती दिली होती. त्याचा आपल्या इमारतीतील काही लोकांशी वाद झाला होता. ही मंडळी आपल्याला मारण्यासाठी येतील, अशी त्याला भीती होती. त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, या विचारात असताना त्याला ही कल्पना सुचली आणि त्याने पोलिसांना खोटी माहिती देऊन बोलावले. पोलीस आल्याने आपल्याला कुणी मारायला येणार नाही, अशी त्याची खात्री होती. अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कसलाही धोका पत्करला नव्हता आणि चार तास हे ऑपरेशन सुरू होते. पोलिसांनी दुर्गाप्रसादला अटक केली. पण सुरक्षा यंत्रणेचा वेळ वाया गेला आणि नाहक सर्वाना त्रास झाला.
वैयक्तिक स्वार्थासाठी सुरक्षा यंत्रणेला वेठीस धरण्याच्या गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना.
* अवघ्या सहा हजार रुपयांसाठी!
२५ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पार्सल विभागाजवळ बॉम्ब ठेवला असल्याचा दूरध्वनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यावेळी पुष्पक एक्सप्रेसह दोन तीन लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटण्याच्या तयारीत होत्या. पोलीस, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, बॉम्ब शोधक पथक आदींनी सर्व गाडय़ा थांबवून त्यांची तपासणी केली. त्यात ३ ते ४ तास गेले. बॉम्ब तर दूर; पण कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळली नाही. गुन्हे शाखेच्या अंधेरी युनिटने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी या प्रकरणात रेल्वे बुकिंग करणारा ट्रॅव्हल एजंट रमेश चौरसिया याला अटक केली. चौरसिया याने पुष्पकची दोन अतिरिक्त तिकिटे आगाऊ बुकिंग करून ठेवली होती. प्रत्येकी दीड हजार रुपयांची दोन तिकिटे त्याच्याकडे होती. ती विकली गेली नसल्याने त्याचे ३ हजार रुपयांचे नुकसान होणार होते. जर ट्रेन तीन तास उशीरा सुटली तर तिकिटाचे पैसे परत मिळतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने शक्कल लढवली आणि रस्त्यात सापडलेल्या सीम कार्डवरून पोलिसांना फोन केला. त्याच्या ३ हजार रुपयांच्या फायद्यासाठी ३ लांबपल्ल्याच्या गाडय़ा ४ तास रखडल्या, सुरक्षा यंत्रणेची दमछाक झाली, हजारो प्रवाशांचे नुकसान झाले आणि वातावरणात तणाव निर्माण झाला.
*  विमान रोखून धरले!
२८ जानेवारीला पोलिसांना एक दूरध्वनी आला. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ रात्री ७ ते १० या वेळेत उडवून देणार असल्याची माहिती अज्ञात इसमाने दिली. त्यामुळे रात्री ४ तास सुरक्षा रक्षकांनी विमानतळाचा कोपरा अन् कोपरा पिंजून काढला आणि विमानांचे उड्ढाण थांबवले. परंतु काहीच सापडले नाही. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अंधेरी युनिटने कबीर हुसेन या इसमाला अटक केली. त्याचा मित्र वसीम याच्याशी त्याचा वाद झाला होता. तो त्याचे पैसे बुडवून विमानाने गुवाहाटीला निघाला होता. जर विमानाचे उड्डाण थांबले तर तो जाऊ शकणार नाही आणि त्याचे नुकसान होईल, यासाठी हुसेनने पोलिासंना फोन करून हे प्रताप केले. गुजरातमध्ये विकास यादव याने कसाबला सोडा अन्यथा विमान हायजॅक करेन, अशी धमकी दिली होती. त्याने अनेकदा असे प्रताप केले होते. स्वत:च्या विकृत आनंदासाठी तो हे कृत्य करत होता.यासंदर्भात गुन्हे शाखेच्या अंधेरी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले की, पोलीस कुठलाच धोका पत्करत नाहीत आणि लगेच सर्तक होऊन कारवाई करतात. त्यामुळे पोलिसांना अशा प्रकारे टार्गेट केले जाते. हे प्रकार घातक असून त्याने सुरक्षा यंत्रणेचा वेळ, शक्ती वाया जाते आणि जनतेत घबराट पसरते. वैयक्तिक स्वार्थासाठी असे कृत्य करणे बंद होणे गरजेचे आहे.