लोकलच्या दारांना झेंडूच्या फुलांची तोरणे, रंगीबेरंगी चमकणाऱ्या कागदांची सजावट, पताकांच्या माळा, प्रसादाचा गोडवा आणि नृत्याच्या जल्लोषात लोकलमधला दसरा उत्साहात साजरा होतो. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अगदी कर्जत-कसाऱ्यापर्यंत प्रत्येक गाडीत उत्साही वातावरणामध्ये दसऱ्याचा आनंद लुटला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा उत्सव साजरा करताना स्थानकाच्या फलाटांवर वाद्य वाजवण्याबरोबरच फटाक्यांची आतषबाजी करण्याचे प्रकार काही अतिउत्साही प्रवाशांकडून होऊ लागले आहेत. रेल्वे स्थानक परिसरामध्ये ज्वलनशील पदार्थ आणणे तसेच फटाके वाजवण्यास मनाई आहे. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी बुधवारपासूनच रेल्वे पोलीस सज्ज झाले आहेत. प्रवाशांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
ठाणे आणि पल्याडच्या स्थानकातून मुंबईकडे लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये दसरा उत्सवाचे विशेष महत्त्व असते. त्यासाठी गाडीचे डबे सजविले जातात. काही ठिकाणी तर चक्क पूजा बांधून प्रवासी दसरा साजरा करतात. एरवी धकाधकीच्या जीवनात हे क्षण प्रवाशांना काही प्रमाणात आनंद देऊन जातात. बदलापूर-अंबरनाथ स्थानकांमध्ये पहाटेपासूनच मोठी लगबग सुरू असते. लोकल गाडय़ांना फुलांच्या माळा, पतांकाची सजावट करण्याबरोबरच रांगोळ्याच्या पायघडय़ाही घातल्या जातात. नाच-गाण्यांची धमाल उडते. काही प्रवासी मोटरमनचा सत्कार करतात. मात्र हा जल्लोष सुरू असताना काही प्रवासी रेल्वे स्थानकांवर फटाक्यांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्थानक परिसरामध्ये ध्वनिप्रदूषण होत असून अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून असे प्रकार वाढीस लागले असून उत्सवातील अशा आततायी कृतीला रेल्वे पोलिसांनी विरोध दर्शवला आहे. असे प्रकार करणाऱ्यांविरोधात रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. रेल्वे स्थानकात ज्वलनशील पदार्थ आणणाऱ्या आणि फटाके वाजवणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दल कारवाई करते. गोंधळावर नियंत्रण राखण्यासाठी स्थानकातील पोलीस बंदोबस्त वाढवला असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली.

लोकलचा उत्सव यंदा दोन दिवस..
नवव्या दिवशी लोकलमधील उत्सव साजरा केला जात असला तरी यंदा नवव्या दिवशी गांधी जयंतीची सुट्टी येत असल्याने अनेक प्रवाशांनी बुधवारी आठव्या दिवशीच लोकलमधील दसरा साजरा केला. अनेक प्रवासी गुरुवारीही स्थानकात दसरा साजरा करणार असल्याने दोन्ही दिवस पोलिसांचा बंदोबस्त या भागात राहणार आहे, असे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

उत्सवाला गालबोट नको..
दसरा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करीत असताना उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची खबरदारी प्रवाशांनी घ्यावी. स्थानकात मोठय़ा आवाजाची वाद्ये वाजवणे, फटाके फोडणे, अगरबत्ती जाळणे, नारळ फोडून कचरा होईल असे प्रकार प्रवाशांनी टाळावे. इतर प्रवाशांना त्रास होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.