सध्या समाज माध्यमांद्वारे मोबाइलच्या आधारे काही असामाजिक तत्त्वांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार होत असून अशा प्रकारचा आक्षेपार्ह संदेश पसरविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भागवत सोनवणे यांनी दिला आहे.
‘व्हॉट्स अप’ तसेच ‘फेसबुक’वर काही जणांकडून जाणूनबुजून वादग्रस्त मजकूर अथवा चित्रीकरण क्लिप टाकल्या जात आहेत. प्रामुख्याने असा वादग्रस्त संदेश किंवा क्लिप या व्हॉट्स अपवरील ग्रुपवर टाकल्या जातात. त्यानंतर त्या इतरत्र प्रसारित केल्या जातात. मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचा संदेश, क्लिप प्रसारित केल्यास ज्या ग्रुपद्वारे त्या प्रसारित केल्या आहेत. त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन आणि पाठवणारा ग्रुप सदस्य यास सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सोनवणे यांनी म्हटले आहे. पोलिसांकडूनही असे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी गोपनीय मोहीम राबविली जाईल. यासंदर्भात कोणाला माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी ०२५९१,२२२९२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.