नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत तीन लोकसभा निवडणुका होत आहेत. त्या शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज आहेत, पण या काळात आणि पुढेही कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव सहन केला जाणार नाही असा सणसणीत इशारा नवीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘महामुंबई वृत्तान्त’शी बोलताना दिला.
पोलीस व महिलांचे सक्षमीकरण करण्यास आपले प्रथम प्राधान्य राहणार असून पोलिसांनी सर्वप्रथम चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रसाद यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची सूत्रे हाती घेतली. तब्बल एक महिन्यात त्यांनी दहा पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पोलिसांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. मी के. एल. प्रसाद आपला नवीन पोलीस आयुक्त अशी पत्राची सुरुवात करून त्यांनी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व पोलिसांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे जाहीर पत्र देऊन आपल्या भावना व्यक्त करणारे ते आतापर्यंतचे पहिलेच पोलीस आयुक्त आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलीस खऱ्या अर्थाने कामाला लागले असून पोलीस ठाणी चकाचक झाली आहेत. पोलीस ठाण्याच्या भेटीवेळी प्रसाद शौचालयाचीही पाहणी करीत असल्याने पोलिसांनी वर्षांनुवर्षे दरुगधीग्रस्त, अस्वच्छ असलेली शौचालये फिनॉल टाकून रातोरात धुऊन काढल्याची उदाहरणे आहेत. गुरुवारी प्रसाद यांनी कोपरखैरणे येथील पोलीस ठाण्याला भेट दिली. अनेक वर्षे राज्याच्या गुप्त वार्ता विभागात काम केलेल्या प्रसाद यांनी कडक शब्दात सहकार्याना समज दिली आहे. समाजातील विविध घटकांशी पोलीस पक्षपातीपणे वागताना मी अनुभवले आहे. पोलीस जेव्हा गुन्हेगारांशी हातमिळवणी करतात, समाजविरोधी घटकांचे हितसंबध जपतात, अयोग्य, अपात्र लोकांसमोर लाळघोटेपणा करतात त्या वेळी मला अतीव वेदना होतात असे त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस होण्याअगोदर चांगले नागरिक बना असा सल्ला त्यांनी दिला आहे. पोलिसांनी विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्याला अडविणाण्या अगोदर आपण हेल्मेट घालून गाडी चालवतो का हे पाहावे. पोलीस ठाण्यात येणारी प्रत्येक तक्रार ही दाखल करून घ्यायलाच पाहिजे. तो नागरिकांचा सांविधानिक हक्क आहे. तक्रार दाखल करुन त्याची एक प्रतदेखील त्या नागरिकाला दिली पाहिजे ते पोलिसांचे कर्तव्य आहे, असा स्पष्ट आदेश प्रसाद यांनी सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांना दिला आहे. चांगल्या पोलिसांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहणार आहे. नवी मुंबई हे वाढणारे शहर आहे. त्यामुळे गुन्हे हे वाढणारच, पण गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटेल अशी पोलिसांची कामगिरी असायला हवी. मंगळसूत्र, घरफोडी, भुरटय़ा चोऱ्या यांसारख्या गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांच्या विश्वासाला तडा जात असल्याने अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. महिला, मुलींची टिंगल, गुंडगिरी, दादागिरी, झुंडशाहीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. बॉक्स पोलीस ठाण्यात देव नकोत, न्यायदेवता हवी, पोलीस ठाण्याचा दौरा करताना अनेक पोलिसांनी आपल्या धर्माचे देव पोलीस ठाण्यात आणून ठेवलेले आहेत. देव मीपण मानतो. माझ्या पाकिटात दोन देवांचे फोटो आहेत. आपला देव हा आपल्यापुरता असावा. त्याला सार्वजनिक रूप देताना पोलीस ठाण्यात आणण्याची गरज नाही. दुसऱ्या धर्मातील नागरिकांना पोलीस ठाण्यात येताना संकोच वाटता कामा नये असे परखड मत प्रसाद यांनी व्यक्त केले. नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्याच्या आवारात धार्मिक स्थळे उभारण्यात आलेली आहेत. काहीजणांनी तर तक्रार कक्षातच देव्हारे बसविले आहेत. त्यावर प्रसाद यांनी हे मत व्यक्त केले.