कारागृहातील कैद्याच्या सुरक्षेसाठी तनात पोलीस कर्मचारी आर. एल. शुक्ला यांनी भरदुपारी गोळी झाडून आत्महत्या केली. घाटी रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. शुक्ला यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृताची पत्नी व मुलांनी केला. पोलीस आयुक्तालयातील निरीक्षक प्रकाश पाठक यांच्याबाबत नातेवाइकांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केली.
कारागृहातील काही कैद्यांना तपासणीसाठी बुधवारी दुपारी घाटी रुग्णालयात आणले होते. रुग्णालयात तपासणी सुरू असतानाच प्रवेशद्वारासमोर बंदुकीतून गोळी सुटल्याचा आवाज आला. अचानक झालेल्या मोठय़ा आवाजामुळे एकच घबराट पसरली. हातातील बंदुकीने घशाखालच्या भागात गोळी लागल्याने शुक्ला यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी मृत कर्मचारी शुक्ला यांच्या मुलांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी वडिलांचा छळ करीत असल्याचा आरोप केला. कोणत्या व्यक्तीला कोठे नेमणूक द्यायची, यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद असल्याची चर्चा आहे.
पोलीस कर्मचारी म्हणून जालना येथे १९९३मध्ये रुजू होण्यापूर्वी शुक्ला लष्करी सेवेत होते. नंतर त्यांनी औरंगाबाद ग्रामीण मुख्यालयात काम केले. पोलीस आयुक्तालयात २००८पासून कार्यरत होते. त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना नुकतेच (२० जून) रुजू करून घेतले होते, असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी प्रकाश पाठक यांच्यासह काही कर्मचारी दररोज बंदोबस्त देताना जाणीवपूर्वक शुक्ला यांचा छळ करीत होते. काही वेळा त्यांच्याकडे पशांची मागणी केल्याचेही शुक्ला यांचा मुलगा योगेश याने पोलीस आयुक्तांना सांगितले. नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीची योग्य ती चौकशी केली जाईल, असे आयुक्त संजय कुमार यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयात काही क्षणात हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ज्या आरोपींच्या बंदोबस्तासाठी शुक्ला यांना पाठविले होते, तेथे ते काहीसे उशिरा पोहोचले होते. तोपर्यंत त्यांचे अन्य साथीदार आरोपींच्या तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. तपासणी सुरू असतानाच ही घटना घडल्याचे त्यांना कळाले. गोळी घशातून खालच्या बाजूने घुसल्याने शुक्ला यांचा रुग्णालयाच्या दारात मृत्यू झाला.