रिक्षा व्यवसायातील बहुतेकजण उद्धट स्वभावासाठी कुप्रसिद्ध असले तरी कल्याणमधील रिक्षाचालक विनय नाफडे मात्र गेली ३५ वर्षे त्यांच्या नावाप्रमाणेच वागून प्रवाशांना सुखद रिक्षा प्रवास घडवीत आहेत. एवढय़ा प्रदीर्घ काळ रिक्षा चालविताना विनय यांना एकदाही वाहतूक पोलिसांची पावती फाडावी लागली नाही. कारण ते कोणताही नियम मोडत नाहीत. जादा भाडय़ाच्या मोहापायी त्यांनी कधीही चौथ्या ग्राहकाला रिक्षात घेतलेले नाही, अथवा नियमापेक्षा अधिक भाडय़ासाठी ग्राहकांबरोबर कधी हुज्जतही घातलेली नाही. त्यांचा हा लौकिक माहिती असल्याने केवळ कल्याणकरच नव्हे तर डोंबिवली ते बदलापूर परिसरातील अनेक ग्राहक त्यांच्या खास कामांसाठी अपॉइंटमेंट घेऊन विनय नाफडेंची रिक्षा बुक करून निर्धास्त होतात.  
कल्याणमधील सिद्धेश्वर आळीतल्या हरेश्वर इमारतीत राहणारे विनय नाफडे १९७८ पासून रिक्षा चालवीत आहेत. सुरुवातीला त्यांची स्वत:ची रिक्षा नव्हती. ते भाडय़ाने रिक्षाचा व्यवसाय करीत. दिवसभराच्या कमाईतील ७५ टक्के मालकाचे आणि २५ टक्के आपले असा हा व्यवहार होता. पुढे १९८२ मध्ये त्यांनी स्वत:ची रिक्षा घेतली. तेव्हापासून आता त्यांची सहावी रिक्षा आहे.
विनय नाफडेंनी दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे आयटीआयमधून वेल्डिंगचा कोर्स केला. मात्र नोकरी न मिळाल्याने त्यांनी रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. तेव्हा रिक्षाचे किमान भाडे अवघे ६० पैसे होते. पुढे ते ९० पैसे आणि मग एक रुपया झाल्याची आठवण ते सांगतात. त्या वेळी कल्याण शहरात जेमतेम हजारएक रिक्षा होत्या. आता हजारो रिक्षा आहेत. मात्र सुरुवातीचा काळ सोडला तर पुढे तीन दशकांत त्यांना कधी ग्राहकांची वाट पाहावी लागली नाही. कारण प्रामाणिकपणा, चोख व्यवहार आणि सुरक्षित प्रवासाच्या हमीमुळे अनेकांना ये-जा करण्यासाठी विनयचीच रिक्षा हवी असते. कल्याण, भिवंडी, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर या परिसरांत त्यांची रिक्षा फिरते. साधारणपणे सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यानच ते रिक्षा चालवितात. आता त्यांचा ९० टक्के व्यवसाय हा असाच आधी ठरलेल्या अपॉइंटमेंटनुसार होतो. त्यामुळे बहुतेकदा घरातून बाहेर पडण्याआधीच त्यांचे भाडे ठरलेले असते. अगदी पुण्याला गेलेले कल्याणकरही रात्री इंद्रायणीच्या वेळी स्थानकाबाहेर हजर राहण्यास विनय नाफडे यांना सांगतात. आता लवकरच ते नवी गाडी घेणार आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईतही जाता येणार आहे.    
वर्तणूक हेच भांडवल
रिक्षा पेट्रोलमुळे धावत असली तरी हा व्यवसाय चालकाच्या वर्तणुकीवर अवलंबून आहे, असे मत विनय नाफडे यांनी वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केले. वाढते पेट्रोल दर, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाढलेला देखभाल खर्च, वाहतूक कोंडी आदी समस्यांमुळे पूर्वीपेक्षा हा व्यवसाय अधिक जिकिरीचा असला तरी महिन्याकाठी सर्व खर्च वजा जाता बारा हजार रुपये मिळतात, असेही त्यांनी सांगितले.