महापालिकेत भाजपने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले आहे. मनसेच्या गायब दोन नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला. दुसरीकडे आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी मनसेने वेळप्रसंगी राष्ट्रवादीसह अन्य पक्षांची मदत घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या सोडचिठ्ठीनंतर बुधवारी सायंकाळी मुंबईत राज ठाकरे आणि मनसेचे प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांची तातडीने बैठक बोलाविण्यात आली. पैशांच्या बळावर फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या दलालांना रोखण्यासाठी मनसेने सर्व पर्याय खुले ठेवल्याचे संकेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे पालिकेत काही नवीन सत्ता समीकरणे जुळून येण्याची शक्यता आहे. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतील घोडेबाजारावर आरोप-प्रत्यारोपांनी प्रकाश पडला आहे.
अडीच वर्षांपासून महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या मनसे-भाजपची युती संपुष्टात आल्यानंतर सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या मनसेने सत्ता राखण्यासाठी धडपड चालविली आहे. या अनुषंगाने राज ठाकरे यांच्यासमवेत बुधवारी मुंबईत प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गिते, अतुल चांडक व महापौरपदासाठी इच्छुक अशा निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. तत्पूर्वी, आ. गिते यांनी महायुतीच्या उमेदवारांवर नाव न घेता तोफ डागली. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मनसेचे दोन नगरसेवक गायब झाले होते. हे नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाल्याची वदंता होती. त्याची चाहूल लागल्यावर मनसेने आपल्या उर्वरित नगरसेवकांना सहलीला पाठविले. गायब झालेल्या नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला.
यंदाच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा धागा पकडून आ. गिते यांनी पालिकेत दलालांचा शिरकाव रोखण्यासाठी मनसे सर्वाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. पालिका निवडणुकीत जनतेने मनसेला कौल दिला. तत्पूर्वी प्रदीर्घ काळ महायुतीची सत्ता होती. दलालांना पक्ष फोडता येतो. यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी मनसेने सर्वाशी चर्चेचे दरवाजे खुले ठेवल्याचे गिते यांनी नमूद केले.
पालिकेत राष्ट्रवादीचे २० नगरसेवक आहेत. त्यांची मदत मिळाल्यास मनसेला बहुमतासाठी केवळ ३-४ सदस्यांचे पाठबळ मिळवावे लागेल. दुसरीकडे सेना व भाजप युतीचे ३७ संख्याबळ असून त्यांना मनसे व इतर पक्षांतून येऊन मिळालेल्या सदस्यांचे पाठबळ मिळू शकेल. दुरंगी लढत झाल्यास ६२चा जादूई आकडा गाठण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग पकडला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू असल्याने प्रत्येकाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. आपल्या पक्षातील नगरसेवक विरोधकांना
जाऊन मिळू नये यासाठी प्रत्येक पक्ष दक्षता घेत आहे. संख्याबळ जमविण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असल्याने घोडेबाजार तेजीत आला आहे.