आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रभाव गणेशोत्सवावर पडल्याचे दिसून येत असून विविध राजकीय नेत्यांच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्या काही गणेशोत्सव मंडळांनी आपल्या देखाव्यांमधून प्रचाराची संधी साधली आहे. तसेच काही जणांनी आरास स्पर्धेच्या निमित्ताने घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याहीक्षणी लागू होण्याची शक्यता आहे. विसर्जन मिरवणुकीआधी आचारसंहिता लागू झाल्यास मिरवणुकीव्दारे होणारे इप्सित साध्य करणे अशक्य होणार असल्याने त्याआधीच वेगवेगळ्या माध्यमांव्दारे राजकीय पक्ष, संघटना प्रचारात गुंतले आहेत.
महायुती आणि आघाडी यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अजून फारशी पुढे सरकत नसल्याने प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघासाठी इच्छूकांची चाचपणी करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर जर महायुती किंवा आघाडी झालीच नाही तर आपणांसही उमेदवारीची संधी मिळू शकेल या आशेने शहर व जिल्ह्यात काही जणांकडून गणेशोत्सवाचे निमित्त पुढे करून प्रचारास सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील नाशिक पश्चिम या मागील निवडणुकीत भाजपकडे असलेल्या मतदारसंघावर शिवसेनेकडून हक्क सांगण्यात येत आहे. तर, भाजप हा मतदारसंघ आपणाकडेच राहील यासाठी प्रयत्नशील असून यां मतदारसंघातून इच्छूक असलेल्या त्यांच्या एक-दोन पदाधिकाऱ्यांकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देणारे फलक मतदारसंघात ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. या फलकांवर असलेली इच्छुकांची हसरी छबी सर्वकाही स्पष्ट करम्यास पुरेशी ठरत आहे. काँग्रेसनेही शहरातील आपल्या कार्यालयाबाहेर उभारलेल्या देखाव्यात महागाई, गैरव्यवहार यांस मोदी सरकार कसे कारणीभूत आहे ते मांडले आहे. अशीच स्थिती त्या त्या राजकीय पक्षांशी संबंधित मंडळांच्या देखाव्यांमधून प्रतिबिंबित होत आहे.
गणेशोत्सवानिमित्त घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन करून काही राजकीय नेत्यांशी संबंधित संघटनांनी घरोघरी प्रचाराची अनोखी संधी साधली आहे. याअंतर्गत प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकासाठी वस्तूरूपात किंवा रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याशिवाय या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वानाच प्रमाणपत्र आणि वस्तू रूपात भेट देण्यात येणार असल्याने त्या त्या भागातील घरांमध्ये आपसूकच पोहोचणे त्यांना शक्य होणार आहे. यानिमित्ताने पक्षातंर्गत प्रतिस्पध्र्यावर दबाव टाकण्याचेही डावपेच आखण्यात येत असून दररोज मंडपातील आरतीसाठी समर्थक राजकीय नेत्यास आमंत्रित करण्यामागे हाच उद्देश आहे. एरवी विसर्जन मिरवणूक म्हणजे राजकीय मंडळींसाठी चमकोगिरी करण्याचे एक साधन असते. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता विसर्जनाआधी जाहीर झाल्यास चमकोगिरीवर र्निबध येऊ शकतात. हे ध्यानात घेऊन विविध स्पर्धाच्या माध्यमातून इच्छूकांनी प्रचारावर भर दिला आहे.