वीज बिलांच्या प्रश्नावरून शहरातील राजकीय लढायांना आता वेग आला आहे. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेत चढाओढ सुरू असून एसएनडीएल कंपनीच्या कार्यशैलीविरुद्ध शिवसेना आणि भाजपपाठोपाठ काँग्रेसही पुरती आक्रमक झाली आहे.
एसएनडीएलविरुद्धची मोहीम सर्वात आधी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी सुरू केली होती. शिवसेनेने वीज बिलांची होळी केल्यानंतर भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी एसएनडीएलच्या कार्यालयात तोडफोड केली होती. हा मुद्दा आपल्याच पक्षाने उचलून धरल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी एसएनडीएलच्या कार्यालयाला टाळे ठोकून जनसभा घेतली. साऱ्यांचा रोख राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर आहे. लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही अजित पवारांनीच ही फ्रॅन्चाईझी नागपूर शहरावर लादली असा आरोप करून त्यांनी अजितदादांना लक्ष्य केले. या लढाईत तीन प्रमुख पक्ष उतरले असले तरी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची स्थिती अवघडल्यासारखी झाली असून या मुद्दय़ावर अद्याप राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झालेली नाही. या मोहिमेने राजकीय वळण घेतल्याने उपमुख्यमंत्र्यांना मुंबईत बैठक बोलावून लोकप्रतिनिधींची मते जाणून घेणे भाग पडले. एसएनडीएलविरुद्धच्या तक्रारी गंभीर असल्याने त्याची चौकशी करण्याचे आश्वासन देऊन अजित पवारांनी बैठक गुंडाळली.
 एकाच मुद्दय़ावर सारे राजकीय पक्ष एकच लढाई लढत असल्याचे चित्र नागपुरात पहिल्यांदाच दिसत आहे. काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी वाढत्या वीज बिलांच्या प्रश्नांवर आवाज उठविताना महावितरण आणि एसएनडीएल यांच्यातील फ्रॅन्चाईझी करार संपुष्टात आणण्याची हाळी देऊन या लढाईत पूर्णाशाने काँग्रेस सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. वीज बिल हा जनतेच्या जीवनावश्यक गरजेशी संबंधित मुद्दा असल्याने याचे श्रेय अन्य पक्षाला जाऊ नये, यासाठी परस्परांवर कुरघोडी करण्याचेच प्रयत्न यातून स्पष्ट झाले आहेत. इलेक्ट्रिक मीटर बदलण्याची सक्ती आणि अवाढव्य वीज बिल यावरून जनतेत असलेला असंतोष स्थानिक नेत्यांनी आता राजकीय संघर्षांत परावर्तित केला आहे. एसएनडीएलकडे नागपुरातील मोठय़ा भागात वीज पुरवठय़ाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष सक्रिय झाला आहे.

मीटर तपासून घ्या – एसएनडीएल
वाढत्या असंतोषामुळे एसएनडीएल कंपनीचे अधिकारी प्रचंड हादरले असून शंका असल्यास ग्राहकांनी महावितरणच्या चाचणी प्रयोगशाळेत मीटर तपासून घ्यावे, असे आवाहन कंपनीचे बिझनेस हेड ए.पी. गांगुली यांनी केले आहे. कंपनीने बसविलेले मीटर अत्यंत उच्च दर्जाचे आणि टेस्टिंगच्या अग्निपरीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. यात कोणताही फॉल्ट नाही. ग्राहकांना हवे असल्यास मीटर बनविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्याची तयारी असल्याचे गांगुली यांनी सांगितले. कंपनीकडून एसएनडीएल आणि ग्राहक टेरिफ स्लॅब रेट बेनिफिटचा लाभ ग्राहकांना दिला जात आहे. जर ग्राहकांचा उपभोग कालावधी ३० दिवसांचा असेल तर ग्राहकाला पहिल्या ३० युनिट्सला ३.३६ दर लागतो तसेच ग्राहकाचा उपभोग कालावधी ४० दिवसांचा असेल तर ग्राहकाला १.३३ महिन्यांसाठी म्हणजेच ४० दिवसांसाठी ४० युनिट्सवर ३.३६ दर लागतो. याप्रमाणे बिलिंग चक्र व बिलिंग दिवसानुसार येणाऱ्या पुढील महिन्यात ग्राहकाचा उपभोग कालावधी २० दिवसांचा आहे, तर ग्राहकाला ०.६६ महिन्यांसाठी २० युनिट्ससाठी ३.३६ दर लागू होईल, असेही त्यांनी सांगितले.