नवी मुंबईत वर्षांगणिक दहीहंडय़ाचे प्रमाण वाढत असून शहरावर एकहाती सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत मंडळांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे जिल्हा नेते सुरेश हावरे यांच्या मंडळाची वाशी येथील दहीहंडी ही सर्वाधिक बक्षिसांची मानली जात होती, पण त्यांनी या दहीहंडीला स्वल्पविराम दिल्याने त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने ही उणीव भरून काढली असून जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी त्यांच्या सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ऐरोलीत बांधण्यात येणारी ११ लाख किमतीची दहीहंडी सर्वात श्रीमंत ठरणार आहे.
नवी मुंबईत दिघा ते पनवेल या भागात या वर्षी २३३ सार्वजनिक दहीहंडय़ा उभारल्या जाणार आहेत. यात चौगुले यांच्या ऐरोली सेक्टर १७ मधील चौकातील दहीहंडी सर्वात मोठी आहे. त्याखालोखाल नेरुळ येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या जनकल्याण मित्र मंडळाच्या वतीने सेक्टर १९ येथे दहा लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी बांधली जात आहे. नवी मुंबईत नेरुळमध्ये सर्वाधिक दहीहंडय़ा बांधल्या जाणार आहेत. वाशीत माजी उपमहापौर भरत नखाते यांच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने पाच लाख रुपयांची परितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. या दहीहंडीच्या समोर अपना बाजार चौकातही यंदा दहीकाला होणार आहे. वाशीतील कर्मशिअल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेक्टर १७ मध्ये राजमाता चौकात शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने दोन लाख ५१ हजार १११ रुपये बक्षिसाची दहीहंडी माजी सभापती संपत शेवाळे यांच्या प्रयत्नाने बांधली जाणार आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनंदा राऊत यांचे पती शशिकांत राऊत यांच्या गोल्डन सांस्कृतिक मंडळाच्या वतीनेही पाच लाख ५१ हजार रुपये बक्षिसांची लयलूट करण्याची संधी गोपाळांना दिली जाणार आहे. कोपरखैरणे येथे स्वर्गीय माजी महापौर तुकाराम नाईक यांचे चिरंजीव वैभव नाईक यांनी आपल्या वनवैभव निकेतनच्या वतीने दोन लाखांचे पहिले बक्षीस ठेवले होते. नवी मुंबईतील ही पहिली मोठी दहीहंडी ओळखली जाते. ऐरोलीत दहीहंडीच्या रकमेत चांगलीच चुरस निर्माण झाली असून शिवसेना जिल्हाप्रमुख चौगुले यांच्या ११ लाख रुपये बक्षिसांच्या दहीहंडीला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी तीन लाख रुपयांच्या बक्षिसाने आव्हान दिले आहे. माजी सभापती अनंत सुतार यांनी अनंत प्रतिष्ठानच्या वतीने दणक्यात दहीहंडी उत्सव करण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी महिला मंडळांना अधिक प्रोत्साहान दिले जाणार आहे. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचे चिरंजीव युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या वतीने ऐरोली येथील रायकर चौकात राजीव गांधी प्रेरणा दहीहंडी उभारली जाणार आहे. यासाठी राज्य युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम येणार असल्याचे समजते.  सानपाडा येथे मोराज रेसिडेन्सीजवळ काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या सीताराम भगत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तीन लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी बांधली जाणार आहे. महापे येथील हनुमाननगरात बागराव मित्र मंडळाच्या वतीने एक लाख ११ हजार रुपये बक्षिसांची दहीहंडी या वेळी गोपाळांचे लक्ष वेधून घेणार आहे. घणसोलीत प्रशांत पाटील मित्र मंडळाच्या वतीन रेल्वे स्थानकाबाहेर दोन लाख रुपये पारितोषिकांची गोपाळ मंडळांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी या उत्सवाच्या निमित्ताने जोरात संपर्क अभियाने सुरू केली असून दहीहंडी उभारण्यास मंडळाने आर्थिक रसद पुरवली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सुमारे एक कोटी रुपये किमतीच्या पारितोषिकांची बरसात गोपाळ मंडळांवर होणार आहे.