राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, गंगापूर रस्त्यावरील प्रमुख चौकात वाहतुकीला अडथळा होईल आणि शहराच्या विद्रुपीकरणात भर पडेल, या पद्धतीने झालेल्या फलक उभारणीवर ‘लोकसत्ता- नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर रातोरात हा फलक गायब झाला. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम सुरू केली असताना शुभेच्छा फलकांद्वारे विपरीत कृती घडत असून हे कसे चालते याकडे लक्ष वेधण्यात आले होते. उपरोक्त छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर भाजपने फलक उभारणारे हेमंत दीक्षित नामक व्यक्तीशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि राज्यात भाजप सत्तारूढ झाल्यावर शहरातील विविध भागात मुख्यमंत्री तसेच भाजपचे नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी फलक लावले आहेत. असाच एक फलक गंगापूर रस्त्यावरील प्रसाद चौकात लावण्यात आला. हेमंत दीक्षित नामक व्यक्तीने आपल्या छायाचित्रासह मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या मधोमध चौफुलीत फलक उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केला. शिवाय, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या धोरणाविरोधात हे कृत्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. त्या फलकाचे छायाचित्र प्रसिध्द झाल्यावर रातोरात हा फलक गायब झाला. तो कोणी काढला हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ झाली. संबंधित व्यक्ती भाजपचा पदाधिकारी वा कार्यकर्ता आहे काय, याचा शोध घेण्यात आला. परंतु, त्याचा पक्षाशी कुठलाही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले, मुख्यमंत्र्यांवरील प्रेमापोटी त्याने हा फलक उभारला असून त्या फलकाशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे नाशिक मध्य मंडलाचे सरचिटणीस देवदत्त जोशी यांनी सांगितले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात कुठेही वाहतुकीला अडथळा होईल, असे फलक उभारलेल नाही. शहरवासीयांना फलकांचा कोणताही त्रास होऊ नये ही भाजपची भूमिका आहे. गंगापूर रस्त्यावरील प्रसाद चौकात उभारलेला फलकाशी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शहराच्या विद्रुपीकरणास भर घालणाऱ्या अनधिकृत फलकांचा विषय गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. या कारणास्तव कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही पालिका शहरातील अनधिकृत फलक काढण्यास तयार नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. काही महिन्यांपूर्वी पोलीस यंत्रणेने अनधिकृत फलक उभारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबविली. परंतु, तीदेखील कालांतराने थंडावली. यामुळे फलकबाजी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात राज्यात नुकत्याच सत्तारूढ ंझालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे पाहावयास मिळते.