माजी नगराध्यक्ष पवार भाजपमध्ये
गेवराईचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पवार यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून, मुंबईत ७ मे रोजी अधिकृत प्रवेश होणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात इनकमिंग सुरू झाली आहे. प्रवेशाची सुरुवात ‘पवारां’ पासून करीत आहोत. जिल्ह्य़ासह राज्यातील अनेक पक्षांमधील नेते भाजपात येणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात सत्तापरिवर्तनाची तयारी आपण केली असल्याचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले. नेत्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे धास्तावलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमेश आडसकर यांना पक्ष सोडणार नसल्याचा खुलासा करण्यास भाग पाडले असावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
बीड येथे मंगळवारी गेवराई तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव गेवराई विकास आघाडीचे प्रमुख व माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पवार यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतल्याची घोषणा मुंडे यांच्या उपस्थितीत केली. भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे या वेळी उपस्थित होते. गेवराई तालुक्यात अ‍ॅड. लक्ष्मण पवार व बाळराजे पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पवार यांनी या निर्णयाच्या अनुषंगाने ८५ गावांचा दौरा केला. गेवराईतील राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व अमरसिंह पंडित या दोन पंडितांविरोधात पवार यांचे सक्षम नेतृत्व निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दि. ७ मे रोजी मुंबईत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अ‍ॅड. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात येणार आहे. आपण लोकसभा निवडणूकच लढवणार आहोत, असे सांगतानाच आपल्याविरुद्ध राष्ट्रवादीला जिल्ह्य़ात सक्षम उमेदवार मिळणे   शक्य    नाही.    कदाचित  बारामतीकडूनच आणावा लागेल, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.