दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा आणि विजयादशमीच्या निमित्ताने एरवी कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांमधील ‘मांडी’याळी उपराजधानीने अनुभवली. विविध कार्यक्रमात हजेरी लावण्याचे औचित्य साधून एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे नेते खुर्चीला खुर्ची लावून जवळ बसलेले दिसून आले.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पूर्तीच्या दोन प्रकल्पांच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना निमंत्रित केले होते. हॉटेल सन अँड सँडमध्ये झालेल्या कार्यक्रमात गडकरी आणि पवार एकाच व्यासपीठावर आले. एकीकडे गोपीनाथ मुंडे शरद पवारांवर वाग्बाण सोडत असताना गडकरी नागपुरात पवारांबरोबर औद्योगिक प्रगतीच्या चर्चेत मग्न होते. पवारांनी वर्षभरात सलग दुसऱ्यांदा पूर्तीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. राजकारणात कोणीच स्पृश्य वा अस्पृश्य नसते, याचा पुनरुच्चार या कार्यक्रमानंतर पवारांनी केला. पवारांचे वक्तव्य सूचक समजले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर याचेही राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.
नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी अलीकडे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात एकत्र दिसू लागले आहेत. दोघांमधून विस्तव जात नाही. दीक्षाभूमीवरील कार्यक्रमात मुत्तेमवार-चतुर्वेदी अगदी शेजारी-शेजारी मांडी ठोकून बसलेले दिसले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नागपुरात घेतलेल्या बैठकीत मुत्तेमवारांनी चक्क चतुर्वेदींना साकडे घालून मतभेद दूर करण्याची मनीषा प्रकट केली होती. मुत्तेमवारांचे आणखी एक विरोधक अनीस अहमददेखील त्यांच्यासोबत बरेचदा एकत्र दिसून आले. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळाल्यास मुत्तेमवारांची गाठ गडकरींशी पडणार आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर पत्राद्वारे तोफा डागणाऱ्या मुत्तेमवारांनी अलीकडे नागपुरात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून खांद्याला खांदा मिळविण्याचा प्रयत्न केला. सुशीलकुमारांशीही मुत्तेमवारांनी जुळवून घेतल्याचे जाणवले. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेले चतुर्वेदीही पुन्हा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये दिसून येत आहेत. मोघेंना बदलून नितीन राऊतांकडे पालकमंत्रीपद सोपविण्याची मागणीही काँग्रेसमधून जोर धरू लागली आहे.