स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव असलेल्या मल्लांच्या आणि स्पर्धेच्या ठिकाणी झळकत आहेत राजकीय नेते, तेही सरकारी खर्चातुन! नगरमध्ये होत असलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेचे हे चित्र आहे. स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थी व तरुणांना कुस्तीविषयी आकर्षण निर्माण करण्याची संधी संयोजन समितीने गमावली आहे. कुस्तीच्या माध्यमातुन महाराष्ट्राचे नाव जागतिक व देशस्तरावर उंचावणाऱ्या एकाही नामवंत मल्लाचे स्मरण स्पर्धास्थानी करण्याची कल्पकता संयोजन समिती, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाने दाखवली नाही.
राज्य सरकारने मुळात ही स्पर्धा आयोजित केली ती ऑलिंपिकमध्ये देशाला कुस्तीत प्रथम पदक मिळवुन देणारे स्व. खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ, परंतु त्यांच्या उत्तुंग कामगिरीच्या पैलुंचे दर्शन घडवणारे चित्र  प्रदर्शन आयोजित केले असते तर ते अधिक उचित ठरले असते व त्याचा उपयोग कुस्तीक्षेत्राविषयी तरुणांमध्ये आकर्षण निर्माण करणसाठी होऊ शकले असते याकडे कुस्तीप्रेमी लक्ष वेधतात. स्व. खाशाबा यांच्यानंतर थेट १९७२ मध्ये मारुती आडकर यांनी ऑलिंपिकचे मैदान गाठले, त्यानंतर आत्तापर्यंतच्या नरसिंग यादवसह, महाराष्ट्रातील अवघ्या ११ पहेलवानांनी ऑलिंपिकची पायरी चढली, त्यांचाही कोठेही उल्लेख स्पर्धास्थळी नाही.
महाराष्ट्राच्या कुस्तीतील एकमेव अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार हे स्पर्धेनिमित्त येथे आले, त्यांची किंवा हिंद केसरी किताब मिळवणारे श्रीपती खचनाळे, गणपत आंदळकर, दिनानाथसिंह, दादु चौगुले, हरिचंद्र बिराजदार, योगेश दोडके यांच्या कामगिरीची माहिती भावी पिढीला व्हावी, असा कोणताही प्रयत्न क्रीडा विभाग, कुस्तीगीर परिषद किंवा जिल्हा तालमी संघ यांनी केलेला नाही.
स्पर्धा भरवताना राजकीय नेत्यांनी विशेषत: राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र स्वत:ला झळकवण्याच्या संधीचा मात्र पुरेपुर वापर करुन घेतला आहे. स्पर्धा स्थळाच्या सर्वप्रवेशद्वारांवर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांपासुन ते युवा नेते व गल्लीतल्या कार्यकर्त्यांसह अनेकांची छबी झळकली आहे. निधी सरकारचा असुनही क्रीडा खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
क्रीडा खात्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी स्पर्धेनिमित्ताने येथे आले आहेत, त्यांनीही याची दखल घेतलेली नाही. गेल्या महिन्यात बारामती येथे खो-खो खेळाच्या राष्ट्रीय खुल्या गटाच्या स्पर्धा झाल्या. त्यावेळीही स्पर्धा ठिकाणी अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फलक लावले गेले होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच दिवशी राजकीय फलक काढणे संयोजकांना भाग पाडले, याविषयी वृत्तही प्रसिद्ध झाले होते, याकडे काही क्रीडारसिक लक्ष वेधतात.
‘लोकसत्ता’ ची दखल
स्पर्धास्थानी केवळ नगरचे नाव देशभर नेणारे स्व. छबुराव लांडगे यांचे नाव व छायाचित्र लावले गेले आहे. संयोजन समितीत ठराव करुनही कालपर्यंत ते स्पर्धा ठिकाणी लावले गेले नव्हते, नगरमधील कुस्तीप्रेमींची ही खंत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करुन व्यक्त केली. त्यामुळे आज सकाळीच स्व. छबुराव लांडगे यांचे नाव व छायाचित्र लावले गेले.