दोन आठवडय़ांपूर्वी पालिकेने दहिसरमधील गणपत पाटील नगरात बुलडोझर फिरवून तेथील झोपडय़ा तोडल्या होत्या. तेव्हापासून आपली मतपेढी वाचविण्यासाठी काँग्रेस, तर सुविधा पुरवूनही निवडणुकीत आपल्याकडे पाठ फिरविणाऱ्यांना इंगा दाखविण्यासाठी शिवसेना सरसावली असल्याचे चित्र समोर येत होते. परंतु या जागेवर बिल्डरांची वक्रदृष्टी वळल्यामुळेच हे दोन्ही पक्ष ‘अटीतटीचा खेळ’ खेळत असल्याचा केवळ देखावा करीत असल्याचे आता उघडकीस येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गणपत पाटील नगर झोपडपट्टीने खाडीमध्ये पाय घट्ट रोवायला सुरुवात केली आहे. या झोपडपट्टीला काँग्रेसचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच या झोपडपट्टीविरुद्ध ठोस कारवाई होऊ शकली नव्हती. एक वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे स्थानिक आमदार विनोद घोसाळकर यांनी येथे पाण्याच्या भल्या मोठय़ा टाक्या बसवून दिल्या होत्या. मात्र तरीही पालिका निवडणुकीत त्यांचा मुलगा अभिषेक याला या परिसरातून मतांची कुमक मिळू शकली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पितापुत्रांनी या झोपडपट्टीविरुद्ध कारवाई करण्याचा जणू पणच केला होता. या दबावामुळे अखेर पालिकेने या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरविला. खारफुटीपासून सुमारे ५० मीटर अंतरावरील तब्बल १४१० झोपडय़ा तोडण्यात आल्या.
झोपडय़ांविरुद्ध कारवाई सुरू असताना काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. अखेर या कारवाईचा वचपा घेण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे उपोषणास बसल्या. शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने याच झोपडपट्टीमध्ये मोठे टोमॅटो मार्केट उभारले असून येथील मत्स्य तळ्यानाही अभय देण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवकाच्या सचिवानेही गणपत पाटील नगरात अनधिकृत बांधकाम केले आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे. अखेर या झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन पालिकेने काँग्रेस नगरसेविकेला दिले आणि तिने सहाव्या दिवशी आपल्या उपोषणाला विराम दिला.
मात्र या दोन्ही पक्षांची ही ‘सक्रियता’ झोपडपट्टीवासियांच्या कळवळ्यातून आलेली नाही. तर बिल्डरांची वक्रदृष्टी या जागेकडे वळल्यामुळे हा सगळा खेळ सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या करण्याच्या बिल्डरांच्या डावाचा एक भाग म्हणून हे दोन्ही पक्ष ‘उंदीर मांजरा’चा खेळ खेळत आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. उद्या या जागेचा विकास झाल्यास त्याचा लाभ कोणाच्या पदरात किती पडणार या गणिताभोवती सध्याचा सगळा ‘गोंधळ’ फिरत आहे.