नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षातील खासदार, आमदारांचा फार मोठा फौजफाटा विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर नवी मुंबईत डेरेदाखल होणार असून, यात शिवसेनेने आमदारांवर प्रत्येक प्रभागांची जबाबदारी वाटून दिली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उत्साह गमावून बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणावी अशी मोर्चेबांधणी करण्यात आलेली नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी तर विकासकामांच्या प्रचारातही पिछाडीवर पडलेली दिसून येत असून निवडणुका लढण्याअगोदरच या पक्षाने शस्त्रे टाकल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई पालिका निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईनंतर नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे राहाव्यात यासाठी मातोश्री आग्रही असून, त्यासाठी भाजपबरोबर युती करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. स्थानिक शिवसेना-भाजपच्या नेत्यांचा युतीसाठी कितीही विरोध असला तरी ही युती करण्यावर भर दिला जाणार आहे. या युतीचा भाजपला किती फायदा होईल यापेक्षा शिवसेनेला त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याने ही युती व्हावी असे सेनेच्या काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे इतर सर्व पक्षांअगोदर शिवसेनेने निवडणूक व्यूहरचना आखली असून सर्व १११ प्रभागांतील उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. यात भाजपला कोणते प्रभाग सोडावयाचे हेदेखील ठरले आहे. यासंदर्भात बुधवारी नेत्यांची बैठक मुंबईत होणार आहे. नवी मुंबईतील प्रचाराच्या आखणीतील एक भाग म्हणून मुंबई, ठाणे, येथील आठ आमदारांवर प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली असून, कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांना नेरुळ विभाग देण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक, प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, पक्षाचे सचिव आदेश बांदेकर, डॉ. अमोल कोल्हे, मंत्री विजय शिवतरे, हे नेते प्रचारासाठी उतरणार आहेत. शिवसेनेच्या या व्यूहरचनेबरोबरच भाजप मोठा फौजफाटा अधिवेशनानंतर कामाला लावणार असून, यात शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार कपिल पाटील, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, सरदार तारासिंग यांच्यासह राज्य कार्यकारणीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिवाय गुजरातमधून देखील काही आमदार, खासदार प्रचारासाठी येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील एक जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपने प्रचाराची अशी तयारी केलेली असताना राष्ट्रवादीने येथील निवडणूक पूर्णपणे माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या दोन मुलांवर सोपविली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी नवी मुंबईत पालिकेच्या एका कार्यक्रमासाठी हजेरी लावून प्रचाराचा नारळ वाढविला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माथाडी कामगारांसाठी माजी मंत्री अजितदादा एखादी सभा घेण्याची शक्यता आहे. माथाडी मतदारांची सर्व सूत्रे आमदार शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेली आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व रमेश बागवे प्रचाराची सूत्रे सांभाळणार असून, ८ एप्रिलनंतर ही प्रचाराची रणधुमाळी माजणार आहे.

राज्यात नवी मुंबई आणि औरंगाबाद या दोनच महापालिकांत निवडणुका असल्याने अशाप्रकारे अनेक पक्षांचे खासदार, आमदार नवी मुंबईत येणार आहेत. त्यात शिवसेनेने आघाडी घेतली असून अनेक आमदारांना जबाबदारीचे वाटप केले आहे. पक्षाच्या अनेक खासदार, आमदारांचे ऋणानुबंध नवी मुंबईत असल्याने त्यांच्या संपर्काचा फायदा पक्षाला होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची ही फौज १११ प्रभाग पिंजून काढणार आहे.
विठ्ठल मोरे, शिवसेना संपर्क नेते.