रोज पक्षांतर करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांची जातकुळी पनवेलच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. यात अनेक गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा अधिक भरणा आहे. पक्षाच्या नावावार हातघाईला येणारे कार्यकर्ते आणि अनेकदा एकमेकांवर पिस्तुली ताणणाऱ्या कार्यकर्त्यांचा बिहारी राजकीय इतिहास येथेदेखील पाहायला मिळत आहे. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर मतदार आणि पक्ष बदलणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकाविण्याची खेळी काही राजकीय पक्ष करीत आहेत. पनवेल आणि तळोजामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन पक्ष कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर धमकावण्याचे आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. बिहारी राजकारणात बंदुकीचा वापर हा नित्याचा झाला आहे. या राजकारणावर तयार होणारे सिनेमादेखील बंदुकीच्या गोळीबाराशिवाय पूर्ण होत नाहीत. इतकेच काय, तर नवी मुंबईतील गुन्ह्य़ांमध्ये वापरण्यात येणारी शस्त्रेदेखील याच राज्यातून येत असल्याचे समोर आले आहेत. पनवेलमधील राजकारणात अनेकदा कार्यकर्ते एकमेकांसमोर बंदुका घेऊन ठाकल्याचे उदाहरण आहे. मागील पनवेल नगर परिषदेच्या निवडणुकीत याची चुणूक पनवेलकरांना पाहायला मिळाली होती. काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीवरदेखील हल्ला झाल्याची नोंद आहे. इतकेच काय, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सध्या तडीपार करण्यात असलेल्या एका कार्यकर्त्यांच्या मुलाने गोळीबार केल्याचे उदाहरण आहे. पक्षामधून आयात-निर्यात होणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावण्यासाठी किंवा रोखण्यासाठी सध्या भाडोत्री गावगुंडाचा वापर पक्षांकडून होत आहे. राजआश्रय मिळालेले गुंड आता स्थानिक नेते होऊ पाहत आहेत. पनवेलमध्ये पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडांमध्ये अधिक याच राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई होऊ नये, यासाठी पक्षांच्या आमदारांनी पोलिसांना फोन करून कारवाई न करण्याची विनंती केली होती.  याच कार्यकर्त्यांच्या मदतीने राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडीचे राजकरण करत असल्याचे सुजाण पनवेलकरांना ज्ञात आहे. याच गुंडांच्या मदतीने काही राजकीय पक्ष मतदारांना आणि पक्ष सोडणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचे कटू सत्य पनवेलमध्ये पाहावयास मिळत आहे. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास गुरुवारी पनवेल पोलिसांनी नवीन पनवेलमध्ये राहणाऱ्या दिनेश ठाकरे (१९) या गुंडाला पकडले. मतदारांना धमकाविण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पनवेल स्थानकाजवळ सापळा लावत त्याला अटक केली. त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्याच्यावर यापूर्वी धमकावण्याचे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तळोजा पोलिसांनी मुरलीधर पाटील याला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक राउंड जप्त केले. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या पाटील याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. एका टोळीबरोबर काम करणारा पाटील त्या टोळी फुटला. त्या टोळीचा मोरक्या सध्या एका पक्षाचा स्थानिक नेता म्हणून कार्यरत आहे. पाटीलदेखील एका पक्षाशी जवळीक साधून आहे. पक्षातील या गावगुडांमुळे मतदार निर्भयपणे मतदार करेल काय, हा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.