पंतप्रधानांपासून माजी मुख्यमंत्र्यांपर्यंत तसेच पक्षप्रमुखांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वच जण प्रचारात उतरले असताना आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा एकच गदारोळ उडाला असतानाही मतदारांमध्ये मात्र विधानसभा निवडणुकीविषयी निरुत्साह जाणवत असल्याने उमेदवारही धास्तावले आहेत. प्रचारास केवळ सहा दिवसांचा अवधी उरल्याने जाहीर सभांची एकच रेलचेल जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. माध्यमांमध्येही निवडणूक ज्वर दिसत असताना ज्यांच्या कल्याणार्थ हा सर्व पट मांडण्यात आला आहे, त्या मतदारवर्गाची भूमिका कळत नसल्याने भावी समीकरणांची जुळवाजुळव करण्यात उमेदवारांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मतदारांमधील उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. या निवडणुकीत मतदार मतदानासाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडणार याचे संकेत मिळत होते. जाहीर सभांना मिळणाऱ्या प्रतिसादातूनही त्याचे प्रतिबिंब उमटत होते. तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांमध्ये जाणवत असलेला निरुत्साह उमेदवारांची घालमेल वाढविणारा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाइतपत टक्केवारी कायम राहील काय, हा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरूनही मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचली किंवा नाही याचा कोणताही अर्थबोध उमेदवारांना होत नाही. आघाडी आणि युती तुटल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात किमान पंचरंगी लढती होत आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असला तरी सर्वच उमेदवारांच्या चौकसभांना मिळणारा प्रतिसादाचा अपवाद वगळता समान असल्याने मतदारांचा कौल नेमका कोणत्या बाजूला, याविषयी उमेदवारच साशंक आहेत.
मतदारांमध्ये जाणवणाऱ्या निरुत्साहाची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. सध्या विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास घेण्यात बहुतांश मध्यमवर्गीय पालक गुंतले असल्याने निवडणुकीकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीपेक्षा त्यांना आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा अधिक महत्त्वाची वाटत आहे. मध्यमवर्गीयांची ही स्थिती असताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये राजकारण्यांविषयी असलेल्या प्रचंड नाराजीचे रूपांतर निरुत्साहात झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोणताही राजकीय पक्ष असो. निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गोष्टी करतो. कृषीमालाला हमी भाव देण्याच्या गप्पा मारतो. परंतु सत्ता मिळाल्यावर एकही आश्वासन पाळले जात नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. शेतीची नेहमीची कामे तर आहेतच. त्यामुळे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची भूमिका कोणाला अनुकूल आणि कोणाला प्रतिकूल हे कळेनासे झाले आहे.
एकिकडे ही अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सणासुदीच्या दिवसांचाही निवडणूक प्रचारावर परिणाम झाला आहे. आधी नवरात्रोत्सव आणि आता दिवाळीची तयारी यामध्ये नागरिक गुंतले आहेत. दिवाळीला फारसा अवधी उरलेला नाही. त्यातच कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यास सुरुवात झाल्याने दिवाळीच्या खरेदीत कामगारवर्ग मग्न आहे. त्यामुळे उमेदवारांकडे लक्ष देण्यास कोणाला फुरसत नसल्याचे दिसून येत आहे. या पाश्र्वभूमीवर प्रथमच मतदानाची संधी मिळणारा नवमतदार मात्र काही प्रमाणात उत्साही आहे. परंतु जाहीर सभांना या नवमतदाराची उपस्थिती फारशी नसती. समाज माध्यमातून आपली भूमिका मांडण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत कोणत्याच समाज घटकाकडून योग्य संदेश मिळत नसल्याने उमेदवारांनाही प्रचाराची दिशा ठरविणे अवघड होत आहे. प्रचारात कोणत्या विषयावर भर द्यावा, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. उमेदवारांची ही स्थिती असताना प्रशासकीय पातळीवरून मात्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पथनाटय़ासह व्याख्यानांचाही आधार घेतला जात आहे. धुळे जिल्ह्यात तर शाळा, महाविद्यालयांसह विविध संस्थांमध्ये ‘आम्ही मतदान करणार, तुम्हीही करा’ अशी सामूहिक शपथ मंगळवारी घेतली गेली. ज्या विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क अद्याप प्राप्त झालेला नाही, त्यांचीही मतदार जनजागृतीसाठी मदत घेतली जात आहे. या जनजागृतीचा योग्य तो परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास जिल्हा निवडणूक यंत्रणेस आहे.