News Flash

राजकीय चिन्हे

‘बरे झाले आघाडी फिस्कटली. आता मला सारखे मनगटाला गुरफटून घेत तुझ्याबरोबर फिरावे लागत नाही,’ घडय़ाळ हाताला म्हणाले.

| October 14, 2014 06:37 am

‘बरे झाले आघाडी फिस्कटली. आता मला सारखे मनगटाला गुरफटून घेत तुझ्याबरोबर फिरावे लागत नाही,’ घडय़ाळ हाताला म्हणाले.
‘आणि मलाही तुझे वाढते ओझे आणि सारख्या टिकटिकीचा कंटाळा आला होता,’ हातानेही बरीच वर्षे मनात साठवून ठेवलेली नाराजी व्यक्त केली.
चौकात निवडणूक प्रचारासाठी लावलेल्या पोस्टर्सवरील बॉइज दिवसभराच्या धावपळीनंतर झोपी गेल्यावर रात्री उशिरा ‘लक्षात ठेवा लक्षात असू द्या आपली निशाणी’ असे म्हणत मतदारांच्या मनावर बिंबवल्या जाणाऱ्या चिन्हांनी गप्पांचा फड जमविला.
कमळ- तुमचं तरी ठीक आहे रे. निदान एकमेकांना जोडून तरी होतात. मनगटावर घडय़ाळ असणारच, हे लोकांनी गृहीत धरलेलं असतं, पण धनुष्यबाणाचा आणि माझा काही संबंध आहे का?
धनुष्यबाण- तरीही २५ वर्षे संसार झालाच ना आपला..
कमळ- हो. एक हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, तर बाकी आपल्यात कायम ३६चा आकडा. कसं सहन केलं, ते माझं मलाच माहीत.
धनुष्यबाण- उगाच कुणाच्या वाटेला मी जात नाही, पण गरजेपेक्षा जास्त ताणले तर धनुष्याची दोरी तुटणारच आणि अगदीच टोकावर जाऊन बसाल तर बाण टोचणारच!
इंजिन- अरे नका रे असे भांडू. एका घरात राहिल्यानंतर भांडय़ाला भांडं लागणारच.
घडय़ाळ- तू गप्प बस रे. फुकट तोंडाची वाफ दवडू नकोस. स्वत: अगदी मस्त एकटा फिरतोस आणि आम्हाला एकीचा उपदेश करतोस?
इंजिन- अरे पण असं एकटं धावण्यात काही अर्थ आहे का? डबे नकोस का सोबत? मी नुसताच फिरतोय, पण पोचत कुठेच नाही.
हात- ‘अतिशहाण्याचा बैल रिकामा’ अशी म्हण आहे आपल्याकडे.
इंजिन- असू दे आमचा बैल रिकामा, पण ‘हात दाखवून अवलक्षण नको’.
घडय़ाळ- रिमोट कंट्रोल दिल्लीत असल्यावर दुसरं काय होणार?
हात- हो, पण माझा रिमोट कंट्रोल किमान एका ठिकाणी तरी आहे. तुझे कान कोण कोण पिरगळतंय ते सांगू का? तुझ्या डय़ुप्लिकेट चाव्या प्रत्येक जिल्ह्य़ात आहेत.
कमळ- गुण नाही तर वाण लागतो म्हणतात तसं आपलं झालंय. राजकीय मंडळींबरोबर राहून आपणही त्यांच्यासारखेच न्यूज चॅनेल्सवरील चर्चेप्रमाणे भांडू लागलोय.
धनुष्यबाण- हे बाकी खरंय. पुन्हा आपल्या स्वभावधर्माचा त्यांच्या धोरणांशी काही मेळ आहे का? आता हेच बघा ना. माझे एकच लक्ष्य असते आणि यांचे? एक पाय मराठीच्या मुद्दय़ावर तर दुसरा हिंदुत्वाच्या..
हात- हो ना. सांगायला आम्ही सर्वसामान्यांच्या पाठीशी, पण प्रत्यक्षात सत्तेसाठी कुणाकुणाशी हातमिळवणी करावी लागते ते मलाच ठाऊक.
घडय़ाळ- पुन्हा एवढं करून हे नामानिराळे, कारण लोकं म्हणतात हल्ली राजकारण्यांची चिन्हे काही बरी दिसत नाहीत. आता मला सांगा चिन्हांनी काय घोडं मारलंय हो? 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 6:37 am

Web Title: political signs
Next Stories
1 शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रंगतदार लढत
2 शिवसेनेसाठी धोक्याची घंटा
3 सेना-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा तर भाजपचे अस्तित्व पणाला
Just Now!
X