लोकसभा निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध करणाऱ्या संजय खोडके यांना राष्ट्रवादीने बाहेरचा रस्ता दाखवणे, जगदीश गुप्ता यांचे भाजपत स्वगृही परतणे आणि काँग्रेसमध्ये पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. सुनील देशमुख यांचा राष्ट्रवादीच्या मंचावरील वावर, यामुळे नजीकच्या काळात अमरावतीच्या राजकीय क्षेत्रात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री नवनीत कौर-राणा यांना राष्ट्रवादीने अमरावतीतून उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या संजय खोडके यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. नवनीत राणा यांच्या प्रचारकार्यात ते सहभागी झाले नाहीत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या महापालिकेतील बहुतांश नगरसेवकांनीही पक्षादेशाला केराची टोपली दाखवली. खोडके यांनी मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात कोणतीही टिप्पणी केली नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेवर खोडके गटाने बहिष्कार टाकला होता. त्याआधी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासमोर खोडके यांनी आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, हे ठणकावून सांगितले होते. अखेरीस संजय खोडके यांची हकालपट्टी करण्यात आली.
खोडके हे वेगळी चूल मांडणार, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. खोडके यांच्या नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो, याचा अंदाज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना आला आहे. अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदार संघासह जिल्ह्य़ातील अनेक भागात खोडके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याने सहानुभूती मिळेल, हे वरिष्ठ नेते जाणून होते, तरीही पक्षांतर्गत दबावामुळे त्यांच्यावर बऱ्याच उशिरा का होईना कारवाई झाली. खोडके यांच्या विरोधातील गटाला त्यामुळे हायसे वाटत असले, तरी राष्ट्रवादीने खंदा शिलेदार गमावल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आहे.
वेगवान राजकीय घडामोडींमध्ये भाजपमधून गेल्या अनेक वर्षांपासून निलंबित असलेले माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांचे स्वगृही परतणेही लक्षवेधी ठरले आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांच्या जनकल्याण आघाडीने डॉ. सुनील देशमुख यांच्या जनविकास काँग्रेसच्या साथीने स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपचेच मोठे नुकसान झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून जगदीश गुप्ता यांचे समर्थक भाजपचे नेते नितीन गडकरींच्या संपर्कात होते, पण गडकरींकडून हिरवी झेंडी मिळत नव्हती. गडकरींना जगदीश गुप्ता यांच्याऐवजी अन्य एका नेत्याची प्रतीक्षा होती, पण या नेत्याने जुनीच वाट निवडल्याने अखेर गुप्ता यांच्या भाजप प्रवेशाचे दार उघडले गेले. येत्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केल्याचे संकेत मिळाले आहेत. डॉ. सुनील देशमुख यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड केले होते, पण त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची धडपड सुरू ठेवली होती.
डॉ. देशमुख यांचे विरोधक आमदार रावसाहेब शेखावत यांनी त्यांची वाट अडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचे पती आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी डॉ. देशमुखांकडे पाठिंबा मागितला. त्यामुळे शेखावतांचा गट नाराज झाला आहे, पण ही नाराजी या गटाला उघडपणे व्यक्त करताही येत नाही. डॉ. देशमुख हे राष्ट्रवादीच्या मंचावर वावरू लागले आहेत. आता डॉ. देशमुख आणि संजय खोडके कोणता रस्ता निवडतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.