चांगले विचार अंमलात आणले तरच देश घडेल, असे नमूद करतानाच राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी राजकारण्यांना सुधरण्याचा सल्ला दिला. अभोणा येथे माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या संदर्भ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे होते. याप्रसंगी व्यासपीठावर माकपचे राज्य सचिव अशोक ढवळे, प्रा. विलास पगार, प्राचार्य अशोक बागूल, के. एन. अहिरे, सुरेश पवार आदी उपस्थित होते. पत्रकार आणि राजकारणी एकत्र आले तर पोलीस काहीही करू शकत नाहीत, असे वास्तवही इनामदार यांनी यावेळी मांडले.
महात्मा गांधींचे खाते कोणत्याही बँकेत नव्हते, परंतु देवेगौडांचे खाते विदेशी बँकांमध्ये देखील आहे. देव देवळात राहत असल्याने देवावर तुमचा विश्वास हवा. त्यासाठी चांगले काम करायला हवे. तुम्ही बदलले तर देश आपोआप बदलेल असे सांगत इनामदार यांनी  आपल्या कार्यकाळातील अनेक घटकांवर प्रकाश टाकला. या संदर्भ पुस्तकाने   भावी    पिढीस  प्रेरणा मिळेल, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला. ढवळे यांनी गावित यांच्या साधेपणाचे कौतुक केले.
जीवा पांडू गावित यांनी आपण लहानपणापासूनच माकपकडे आकर्षित झाल्याचे सांगितले. श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आपण झटत आहोत. आजपर्यंत सुमारे १८ हजार सामूहिक विवाह लावले. सुरगाण्यात वृद्धापकाळ पेन्शन योजनेचा एक हजार जणांना न्याय मिळवून दिला.
पाण्याची कमतरता असलेल्या सुरगाणा तालुक्यातून २० हजारांपेक्षा अधिक लिटर दूध गुजराथ व इतर राज्यांमध्ये पाठविले जात आहे. मंत्री होऊन समाज सुधारत नाही. मात्र मंत्री श्रीमंत बनतो. तो स्वत:चे उखळ पांढरे करून घेतो, अशी टीकाही त्यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. किशोर पगार यांनी, तर प्रास्ताविक बी. के. जाधव यांनी केले.