लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने इतर पक्षांची दाणादाण उडविल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून स्वत:ला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असताना आघाडीचे विद्यमान आमदार तसेच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची स्थिती मात्र सैरभैर असल्याचे दिसून येत आहे. मोदी लाटेचा प्रभाव विधानसभा निवडणुकांवरही राहण्याची चिन्हे दिसत असल्याने आणि राज्यातील आघाडी सरकारविरोधात असलेल्या नकारात्मक भावनेची झळ आपणास बसू नये यासाठी जिल्ह्यातील आघाडीतील काही दिग्गज शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेमुळे शिवसेना तसेच भाजपमधील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली असून, ऐनवेळी पक्षात येऊन सत्ताधारी आघाडीतील कोणाला विधानसभेसाठी उमेदवारी देणे योग्य होणार नाही, असा सूर आळविला जाऊ लागला आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारचे काही खरे नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या दणदणीतपणे पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आघाडीतील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उत्साहहीन झाले असून, कार्यकर्त्यांना कार्यरत करण्यासाठी आघाडीकडून हरतऱ्हेने प्रयत्न होत असले तरी त्यांना विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने लोकप्रतिनिधीही निराश झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर मोदी लाटेवर फोडले गेले असले तरी अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल, त्याप्रमाणे आघाडीतील फाटाफुटीला सुरुवात होईल, अशी चर्चा आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे धूसर असल्याची भावना खुद्द आघाडीतील कार्यकर्त्यांचीच झाली असून, या पाश्र्वभूमीवर काही दिग्गज विरोधकांना जाऊन मिळण्याच्या तयारीत असून सिन्नरमधून राजाभाऊ वाजे यांनी तर राष्ट्रवादीचा राजीनामाही दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेऊन विधानसभेसाठी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे येवला मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीचे संभाजी पवार यांनीही उद्धव ठाकरे
यांची भेट घेतलीे.
याशिवाय मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीचे परंतु गतकाळात युतीशी संबंध आलेल्या आघाडीच्या काही विद्यमान आमदारांचीही यादृष्टीने नावे घेतली जात असून, संबंधितांकडून या चर्चेचे खंडन होत नसल्याने पाणी कुठेतरी मुरतंय हे स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने कळवण, चांदवड-देवळा, सिन्नर या मतदारसंघांमध्ये भाजप-सेनेकडून उमेदवारीसाठी आघाडीतील मंडळी अधिक प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या तिघा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांनी यापूर्वी युतीला सहकार्य केलेले आहे.  दरम्यान, आघाडीतील दिग्गज उमेदवारीसाठी युतीला जवळ करण्याच्या केवळ चर्चेने युतीतील इच्छुकांचे धाबे दणाणले असून विजयासाठी सर्व दृष्टीने योग्य वातावरण असताना त्यात बिब्बा घालण्याचा प्रयत्न झाल्यास निष्ठावंतांच्या मानसिकतेवर त्यामुळे परिणाम होऊ शकतो, अशी भावना युतीमध्ये व्यक्त केली जात आहे. युतीकडून इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यात येवला मतदारसंघातून माजी आमदार आणि दोन वेळा पराभूत झाल्यानंतरही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले कल्याणराव पाटील यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गावागावांमध्ये जाऊन त्यांनी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत भुजबळ यांना पाटील हे पराभूत करू शकतात, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे. कळवणमधून विद्यमान आमदार ए. टी. पवार हे स्वत: किंवा त्यांच्या कुटुंबातील एक जण विधानसभेसाठी भाजपला जवळ करण्याची चर्चा आहे. भाजपही या मतदारसंघातून प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहेच. त्यामुळे असा आयता उमेदवार मिळणार असेल तर भाजपमध्ये त्याचे स्वागतच होण्याची चिन्हे आहेत. आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री नारायण राणे यांचे समर्थक म्हणून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव घेतले जाते. लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांना सक्रिय करण्यासाठी राणे यांना सिन्नरमध्ये सभा घ्यावी लागली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राणे हे स्वत: काँग्रेसमध्ये राहतील की जातील, याबाबत दोलायमान परिस्थिती असताना पुढील राजकीय गणित ओळखून कोकाटे हेही पुन्हा एकदा शिवसेनेला जवळ करू शकतील. काँग्रेसकडून नेहमीच त्यांना मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आले, परंतु प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आल्याची समर्थकांची भावना आहे. लोकसभा निवडणुकीत कोकाटे समर्थकांनी उघडपणे शिवसेनेला मदत केल्याचे दिसून आले. चांदवडमधून शिरीष कोतवाल यांच्या हालचालींकडेही युतीचे लक्ष आहे. दरम्यान, युतीकडून उमेदवारीसाठी कित्येक दिवसांपासून तयारी सुरू करणाऱ्या इच्छुकांमध्ये बाहेरून आलेल्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे.