काँॅग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने यवतमाळ नगरपालिकेत सेना, भाजप, बसपा या पक्षांशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या नगरविकास आघाडीतील बिघाडी झाल्याचे जे चित्र नगराध्यक्ष योगेश गढीया यांच्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळी स्पष्ट  झाले त्याचे मूळ विधानसभा पोटनिवडणुकीत कांॅग्रेसच्या ‘पंजा’ ला राष्ट्रवादीने बांधलेल्या ‘घडय़ाळा’ च्या घडामोडीत असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्य़ात कांॅग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याच विळा-भोपळ्याचे सख्य असून, कॉंग्रेसला जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने  दोन्ही ठिकाणी सेना, भाजप, बसपा, अशा विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांशी युती केली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरपालिकेत भाजपचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष, असे सत्तावाटपाचे सूत्र अंमलात आणले. गंमत अशी की, जिल्हा परिषदेत कांॅग्रेसचे २४, राकांॅचे २२, तर नगरपालिकेत कांॅग्रेसचे १० आणि राकांॅचे ६, असे संख्याबळ असूनही कॉंग्रेसची सत्तेची गढी उध्वस्त करून भाजपच्या योगेश गढिया यांना राकॉंने नगराध्यक्षपदी बसवले होते. कॉंग्रेससोबत आघाडी करणार नाही, ही आपली भूमिका मोडित काढून राष्ट्रवादीने विधानसभा पोटनिवडणुकीत कांॅग्रेस उमेदवार नंदिनी पारवेकर यांच्या बाजूने निवडणुकीचा किल्ला लढवला आणि भाजपच्या मदन येरावारांचा पराभव करण्यात वाटा उचलला. तेव्हापासूनच नगरपालिकेतील राकाँ, भाजप, सेना, बसपा, यांच्या विकास आघाडीला िखडार पडले होते.
भाजप नगराध्यक्ष योगेश गढिया यांना कराराप्रमाणे राजीनामा देण्यास सांगावे, हा राष्ट्रवादीचा आग्रह भाजपच्या एका गटाला अजिबात मान्य नव्हता. कारण, राष्ट्रवादीनेच विधानसभा पोटनिवडणुकीत कांॅग्रेसची साथ देऊन ‘अधर्म’ केल्याची भावना भाजपच्या काही नेत्यांमध्ये होती. दरम्यानच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये शाब्दिक युध्दाच्या ज्वाला इतक्या भडकल्या की, दोन्ही पक्षांमधून विस्तवही जाणे कठीण झाले. याच पाश्र्वभूमीवर धनशक्तीच्या जोरावर नगराध्यक्ष गढिया यांना सत्तेवरून उतरवण्याच  डाव राकांॅच्या काही नगरसेवकांनी आखला आणि त्याला भाजपचे काही नेते बळी पडले. गंमत अशी की, भाजपाच्या १६ पकी ५ नगरसेवकांनी, राकाँच्या ६ पकी एका सदस्याने व बसपाच्या ४ पकी एका सदस्याने विकास आघाडीचा व्हिप झुगारून योगेश गढिया यांना साथ दिली आणि कांॅग्रेसनेही राष्ट्रवादीला झटका देण्यासाठी भाजपच्या गढियांना हात देऊन त्यांची सत्तेची गढी राखली. राष्ट्रवादीने विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या नंदिनी पारवेकर यांची साथ न करता कांॅग्रेसला धडा शिकवायचा, असा राकाँच्या काही नेत्यांचा आग्रह होता. पण, हेच नेते भावनावश झाले आणि अपघातात निधन झालेल्या कांॅग्रेस आमदार निलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकरांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही, अशी जाहिर भूमिका त्यांनी घेतली. नेमकी ती कांॅग्रेसच्या पथ्यावर पडून नंदिनी पारवेकर निवडून आल्या.
विशेष बाब ही की, विधानसभा पोटनिवडणुकीनंतर कांॅग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी पुढेही कायम राहील, अशा आणाभाका दोन्ही पक्षांनी घेतल्या होत्या. नगरपरिषदेतील विकास आघाडीतील सर्वच पक्षात बिघाडी झाल्याने आघाडीचा धर्म पाळला नाही, असा प्रश्न विचारणाऱ्यांना ‘तेव्हा गेला कुठे, सुता तुझा धर्म?’ असा प्रश्न विचारला जात आहे आणि या प्रश्नाचे राजकारणात उत्तर नसते, हे सर्वश्रुत आहे.

यवतमाळात कांॅग्रेसचे सत्तेचे अभिवचन
कांॅग्रेसच्या ‘व्हिप’मुळे जीवनदान मिळालेल्या भाजपच्या नगराध्यक्ष योगेश गढियांनी पालिकेत कांॅग्रेसची सत्ता आणण्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दिलेले अभिवचन पाळण्यासाठी गढिया भाजपच्या कोणत्या तीन नगरसेवकांना आपल्या गळाला लावतात, याकडे राजकीय वर्तुळात चच्रेचे पेव फुटले आहे. स्वपक्षानेच अविश्वास प्रस्तावाचे समर्थन केल्याने गढिया संतप्त आहेत. कांॅग्रेसने केलेल्या उपकाराचे ऋण कांॅग्रेसची सत्ता आणून फेडण्याची गढियांची मानसिकता झाली आहेत. त्यासाठी त्यांना पालिकेत आपला गट निर्माण करण्यासाठी भाजपच्या १६ पकी ८ सदस्यांची गरज आहे. ५ सदस्य त्यांच्यासोबत आहेत. आणखी ३ सदस्य त्यांना हवे आहेत. भाजपचे हे ३ नगरसेवक कोण असतील, हाच चच्रेचा विषय आहे. भाजपचे ८, कांॅग्रेसचे ९, बसपा १, राष्ट्रवादी १, अपक्ष ३, अशी २१ सदस्यांची मोट बांधून ४० सदस्यीय नगरपालिकेत कांॅग्रेसची सत्ता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.