13 July 2020

News Flash

विधानसभेसाठी सर्व पक्षांमध्ये ‘मध्य नाशिक’ कळीचा मुद्दा

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात पावणेदोन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी

| May 23, 2014 07:02 am

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात पावणेदोन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर महायुतीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला असून या आत्मविश्वासाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीचे मैदानही सहजपणे मारण्याचा दावा त्यांचे नेते करू लागले आहेत. इगतपुरी विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सर्वच मतदारसंघांमध्ये महायुतीने आघाडी घेतली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी मिळण्याची ज्या विधानसभा मतदारसंघातून अपेक्षा होती त्या मध्य नाशिक मतदारसंघातही महायुतीने आघाडी घेतल्याने या मतदारसंघातील दावेदारीवरून शिवसेना-भाजपमध्येच तीव्र स्पर्धा सुरू होण्याची चिन्हे आहेत. सध्या या मतदारसंघात मनसेचे सरचिटणीस वसंत गिते हे आमदार असून लोकसभा निवडणुकीत मनसेची झालेली पीछेहाट पाहता त्यांना आपली आमदारकी कायम राखण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागणार आहेत.
अवघ्या चार महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्याने लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरून आघाडी आणि मनसे कामाला लागली असताना भाजप आणि शिवसेना मात्र विजयाच्या धुंदीतून बाहेर येण्यास अद्यापही तयार नाहीत. विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघ हा सर्वच पक्षांच्या दृष्टिने कळीचा मुद्दा ठरणार आहे. अल्पसंख्यांकांची बऱ्यापैकी संख्या या मतदारसंघात असल्याने आघाडीसाठी हा मतदारसंघ काहीसा अनुकूल असल्याचे गणित मांडण्यात येत होते. परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीने या मतदारसंघातही आघाडी घेतल्याने शिवसेना आणि भाजपमधील इच्छुकांचे डोळे विस्फारले आहेत. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला असून महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे यांची नावे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. या मतदारसंघाची रचनाच अशी आहे की एकसंघपणे शिवसेना निवडणुकीला सामोरी गेली तरच त्यांना या मतदारसंघात विजयाची आशा आहे. दुसरीकडे शहरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अदलाबदल शक्य आहे काय, याविषयी भाजपमध्येही चर्चा सुरू आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेकडे तर त्याऐवजी मध्य नाशिक मतदारसंघ भाजपच्या ताब्यात यावा अशी भाजपमधील काही कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसे झाल्यास भाजपमध्ये प्रा. देवयानी फरांदे, सुरेश पाटील यांची नावे चर्चेत राहतील. या मतदारसंघात विद्यमान आमदार वसंत गिते यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना चांगलीच तयारी करावी लागणार आहे. मागील निवडणुकीसारखी परिस्थिती यावेळी नसल्याने गिते यांच्या लोकप्रियतेची आणि कौशल्याची कसोटी पाहणारी ही निवडणूक राहील. आघाडीपैकी काँग्रेसच्या ताब्यात हा मतदारसंघ असून राष्ट्रवादीने या मतदारसंघावर ताबा सांगण्याची मागणी काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बदलत्या परिस्थितीत आघाडीतील दोन्ही पक्षांसाठी या मतदारसंघातून यश मिळविणे काहीसे कठीण असले तरी शहरातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत मध्य नाशिकमध्येच आघाडीला थोडीफार आशा बाळगता येऊ शकते. त्यादृष्टिने आघाडीतील दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून केंद्रात नवीन सरकारचा शपथविधी झाल्यानंतर महायुतीही विधानसभेची रणनीती ठरविण्यात गर्क होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 7:02 am

Web Title: politics in nashik
टॅग Politics
Next Stories
1 नेत्रदान, देहदानाविषयी व्यापक जनजागृतीची गरज
2 नाशिक जिल्ह्यात नऊ धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर
3 पंचवटी परिसरात आज पाणी पुरवठा नाही
Just Now!
X