10 April 2020

News Flash

सातबारा – नवी मुंबई महापालिका निवडणूक : राजकारण

प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक ११ ते २५ या १५ प्रभागांत अनेक आजी माजी नगरसेवकांचे तसेच त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य ठरणार आहे.

| April 11, 2015 12:25 pm

प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक ११ ते २५ या १५ प्रभागांत अनेक आजी माजी नगरसेवकांचे तसेच त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे घराणेशाहीचे प्रभाग असे या प्रभागांचे वर्णन करता येईल. स्वत:चा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने आपला प्रभाग क्रमांक दहामध्ये पत्नीला उभे करून मावळत्या सभागृहातील सभागृह नेते अनंत सुतार यांनी नशीब आजमावयला शेजारच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये घुसखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना तेथे किती प्रतिसाद मिळेल ते निवडणूकीत स्पष्ट होणार आहे. त्यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या अंकुश सुतार उभा ठाकला असून त्यांची खरी लढत शिवसेनेचे आकाश मढवी यांच्याबरोबर आहे. हे मढवी म्हणजे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे जावई. त्यामुळे कानामागून आले आणि तिखट झाले अशी भावना येथील शिवसैनिकांत आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि उमेदवारीचे दावेदार रवींद्र सिनकर यांना मढवी यांनी पटविल्याने मढवी यांचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील आरपीआयचे कार्यकर्ते विजय पाडले शेकापच्या तिकिटावर नशीब आजमवत आहेत. शिवसेनेचा पहिल्यापासून बालेकिल्ल असलेला ऐरोली गाव या वेळी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने सर्व पक्षांना उमेदवार अक्षरश: शोधण्याची वेळ आली. त्यामुळे शिवसेनेतून राजू कांबळे आणि राष्ट्रवादीतून श्रीकांत शेळके या दोन अपरिचित उमेदवारांची लॉटरी लागली. त्यात आरपीआयचे सूर्यकांत पोळदेखील उभे आहेत. मातोश्रीवर काही काळ काम केलेले जुने शिवसैनिक विनोद कांबळे यांना उमेदवारी द्यावी यासाठी नगरसेवक राजू पाटील प्रयत्नशील होते पण तेथे नाहटाशाही जिंकली आणि पालिकेत असताना नाहटांचे ऋणानुबंध जपलेले माजी अधिकारी संजू वाडे यांची उमेदवारी या प्रभागात लादण्यात आली. वाडे या प्रभागात राहतदेखील नाहीत. त्यामुळे सैनिकांत नाराजी आहे. त्याचा फायदा पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व राष्ट्रवादीचे उमेदवार राजू सूर्यवंशी यांना होण्याची शक्यता आहे. ऐरोली सेक्टर तीनमध्ये माजी विरोधी पक्षनेता मनोज हळदणकर यांचा प्रभाग अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची पंचाईत झाली. त्यांनी आपला वर्गमित्र कुंदन काटे यांच्या पत्नीला रिंगणात उतरविले असून हा प्रभाग सेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. सेक्टर १५ मध्ये नगरसेवक अशोक पाटील यांनी आपली पत्नी संगीता पाटील यांना पुढे केले असून सेनेने हा प्रभाघ भाजपला सोडला असून विद्या शिंदे पाटील यांचा सामना करणार आहेत. संपूर्ण ऐरोलीत कमी उमेदवार (तीन) असलेला प्रभाग क्रमांक १६ असून नगरसेविका विनया मढवी यांची लढत नगरसेवक तात्या तेली यांची पत्नी विजया तेली यांच्या बरोबर होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मढवी कुटुंबीयाने राष्ट्रवादीची साथ सोडून शिवबंधन बांधले आहे. त्यांना तीन ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. ऐन वेळी शिवसेनेचा उमेदवाराने पलटी खाऊन भाजपची उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. शेखर घोगरे हे सेनेचे उमेदवार होते पण हा प्रभाग भाजपला दिला गेल्याने रजनी घोगरे भाजपच्या उमेदवार झाल्या. विद्यमान नगरसेविका हेमांगी सोनावणे यांच्याबरोबर सामना होणार आहे. प्रभाग क्रमांक १८च्या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीने ही लढत प्रतिष्ठेची केली असून पक्षांतर करणाऱ्या एम. के. मढवी यांची लढत तात्या तेली यांच्या बरोबर आहे. हे दोघेही नगरसेवक असून काटे की टक्कर होणार आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा असणारा प्रभाग क्रमांक १९ हा रबाले येथील झोपडपट्टीतील दोन प्रभागांपैकी एक प्रभाग आहे. या ठिकाणी नगरसेविका रंजना शिंदे आरपीआयच्या तिकिटावर उभ्या असून त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या विजया उघाडे आहेत. या प्रभागाशेजारील प्रभाग माजी शिक्षण सभापती सुधाकर सोनावणे यांचा असून त्यांची लढत. डॉ. तुकाराम पाटील यांच्या बरोबर आहे. हे दोन्ही प्रभाग सोनावणे मामा यांचे बालेकिल्ले मानले जातात. मध्यमवर्गीयांच्या प्रभाग क्रमांक २१ मध्ये एम. के. मढवी यांचा मुलगा करण मढवी पहिल्यांदाच निवडणूक लढवीत असून त्यांची लढत आमदार संदीप नाईक यांचे महाविद्यालयीन मित्र व राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष जयेश कोंडे यांच्याबरोबर आहे. या दोघांत भाजपच्या तिकिटाच्या आशेवर असलेले सुदर्शन जिरगे अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आहेत. शिवसेनेचे बंडखोर सुरेश भिलारे प्रभाग क्रमांक २२ मध्ये उभे असून आदित्य ठाकरे यांच्या शिफारशीनुसार देण्यात आलेल्या चेतन नाईक यांच्या उमेदवारी विरोधात ठाकले आहेत. भिलारे यांना सेनेची बडी मंडळी सहकार्य करीत आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जी. एस. पाटील भिलारे यांचा सामना करणार आहेत. चौगुले यांचे सुपुत्र ममित चौगुले सेक्टर १० मधून निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे लादलेले सीताराम मढवी उभे करण्यात आले आहेत. अपक्ष सुखदेव जाधव यांचे आव्हान आहे.
माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय रमाकांत म्हात्रे यांची पत्नी मंदाकिनी रिंगणात उतरल्या असून त्याचा सामना एकाच वेळी शिवसेनेच्या मधुमती म्हात्रे व पपिता पाटील यांच्याबरोबर आहे. म्हात्रे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये माजी नगरसेवक हरीष वाघमारे यांची पत्नी अनिता व भाजपच्या वर्षां राठोड यांचा सामना होणार आहे.

प्रभाग क्रमांक ११ ते २५ मधील समस्या
ऐरोली नाक्यावरील तालावाची दुर्दशा झाली आहे. ऐरोली सेक्टर १ येथील पादचारी पुलावर विजेचा अभाव असल्यामुळे गर्दुल्ल्यांनी या ठिकाणी आपला अड्डा केला आहे. फेरीवाल्यांची समस्या ही या सर्वच प्रभागांमध्ये जटिल समस्या आहे. पार्किंगदेखील रस्त्यावर करण्यात येत असल्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला असणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली अनधिकृतपणे झोपडय़ा वसविण्यात आल्या आहेत. सेक्टर ३ येथे बेकायदेशरीपणे प्रार्थनास्थळे उभारण्यात येत आहेत. सेक्टर १४ येथील कृत्रिम तलावामध्ये डेब्रिज टाकण्यात येऊन तो बुजवण्यात आले आहे. ऐरोली सेक्टर ३ येथे भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. ऐरोली सेक्टर १७ येथील दफनभूमीची दुर्दशा झाली आहे. गावांमध्ये बेकायदा इमारती उभ्या ठाकण्यात आल्या. रबाले येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. फेरीवाल्यांनी या प्रभागामध्ये उच्छाद मांडला आहे. आंबेडकर नगरमध्ये शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे.

प्रभाग क्रमांक ११ ते २५ मधील प्रमुख लढती
प्रभाग क्रमांक ११
प्रभागाचे नाव –  ऐरोली गाव
लोकसंख्या – १०९०५
मतदार – ७३०१
राष्ट्रवादी काँग्रेस – श्रीकांत शेळेक
शिवसेना – राजू कांबळे
प्रभाग क्रमांक १२
प्रभागाचे नाव – ऐरोली नोड २
लोकसंख्या – १०७४९
मतदार – ८१४३
राष्ट्रवादी काँग्रेस – राजू सूर्यवंशी
शिवसेना  – संजू वाडे
प्रभाग क्रमांक १३
प्रभागाचे नाव  – ऐरोली नोड ३
लोकसंख्या – ९८४४
मतदार – ८८१५
राष्ट्रवादी काँग्रेस – नम्रता मोरे
शिवसेना  – नंदा काटे
काँग्रेस – स्वाती कवठेकर
प्रभाग क्रमांक १४
प्रभागाचे नाव – ऐरोली नोड ४
लोकसंख्या – ११०६३
मतदार  – ६७५९
राष्ट्रवादी काँग्रेस – अनंत सुतार
शिवसेना- आकाश मढवी
अपक्ष- अंकुश सुतार
प्रभाग क्रमांक १५
प्रभागाचे नाव  – ऐरोली नोड ५
लोकसंख्या – १०७४१
मतदार – ९११४
राष्ट्रवादी काँग्रेस – संगीता पाटील
भाजपा – विद्या शिंदे
प्रभाग क्रमांक १६
प्रभागाचे नाव  – ऐरोली नोड ६
लोकसंख्या  – ११४३२  
मतदार – ८९७१
राष्ट्रवादी काँग्रेस – विजया तेली
शिवसेना – विनया मढवी
प्रभाग क्रमांक १७
प्रभागाचे नाव  – ऐरोली नोड ७
लोकसंख्या  – १११७२
मतदार – ९११७
राष्ट्रवादी काँग्रेस –  सिदरा खान
काँग्रेस- हेमांगी सोनवणे
भाजपा   – रंजनी घोगरे
प्रभाग क्रमांक १८
प्रभागाचे नाव –  ऐरोली नोड ८
लोकसंख्या – ९७९९
मतदार – ८७४९
राष्ट्रवादी काँग्रेस – न्हानू तेली
शिवसेना  – एम. के. मढवी
प्रभाग क्रमांक १९
प्रभागाचे नाव – डॉ. आंबेडकर नगर
लोकसंख्या – १०९८२    
मतदार – ८०९१
काँग्रेस  – सुनंदा उघडे
आरपीयआय – रंजना सोनवणे
प्रभाग क्रमांक २०
प्रभागाचे नाव – भीमनगर
लोकसंख्या – १३३५७
मतदार – ८९००
भाजप  –  तुकाराम पाटील
आरपीआय – सुधाकर सोनवणे
प्रभाग क्रमांक २१
प्रभागाचे नाव – ऐरोली नोड ९
लोकसंख्या  – ९७९९
मतदार – ५१३०
राष्ट्रवादी काँग्रेस – जयेश कोंडे
शिवसेना – करण मढवी
अपक्ष – सुदर्शन जिरगे
प्रभाग क्रमांक २२
प्रभागाचे नाव – दिवा गाव
लोकसंख्या – १११८०
मतदार – ७३६६
राष्ट्रवादी काँग्रेस – जी. एस. पाटील
शिवसेना – चेतन नाईक
अपक्ष  – राजेश मढवी
अपक्ष – सुरेश भिलारे
प्रभाग क्रमांक २३
प्रभागाचे नाव – ऐरोली नोड १०
लोकसंख्या – ९२३४
मतदार – ६४१०
राष्ट्रवादी काँग्रेस – सीताराम मढवी
शिवसेना-  ममित चौगुले
प्रभाग क्रमांक २४
प्रभागाचे नाव – रबाळे
लोकसंख्या – ९०९२
मतदार – ८८००
राष्ट्रवादी काँग्रेस – पपिता पाटील
शिवसेना- मधुमती म्हात्रे
काँग्रेस- मंदाकिनी म्हात्रे
प्रभाग क्रमांक २५
प्रभागाचे नाव – गोठिवली
लोकसंख्या – ९३१८
मतदार – ५३४९
राष्ट्रवादी काँग्रेस – अनिता वाघमारे
भाजपा – वर्षां राठोड
काँग्रेस – अनिता मानवतकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2015 12:25 pm

Web Title: politics in navi mumbai municipal corporation elections
टॅग Politics
Next Stories
1 आजी-माजी नगरसेवकांचा प्रवास लखपती ते करोडपती
2 आपले शहर आपल्या समस्या : तळीराम, जुगाऱ्यांची हक्काची उद्याने
3 होऊ द्या चर्चा : प्रचारातील छल्ला
Just Now!
X