नागपूर शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने शहरातील विविध भागात सिमेंट रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील सिमेंट रस्त्यांना झुकते माप देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र ‘साईडट्रॅक’ केले जात असल्याची चर्चा आहे.
नागपूर शहराचा विकास करताना शहरातील रस्ते चकाचक असावे. यादृष्टीने महापालिकेने शहरात विविध भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चार वर्षांंपूर्वी केडीके कॉलेज ते घाट रोड आणि बजाजनगर ते शंकरनगर असे २५.९३ किलो मीटर सिमेंटच्या रस्त्यांचे चार वषार्ंपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. ज्या कंत्राटदाराला सिमेंट रस्त्याचे काम देण्यात आले होते. त्याला आठ महिन्यात हे रस्ते पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. दोन्ही ठिकाणच्या सिमेंट रस्त्यांचे काम एकाचवेळी सुरू करण्यात आले होते. मात्र, या काळात कंत्राटदाराला पैसे न दिल्याने काम बंद करण्यात आले होते. सध्या पूर्व नागपुरातील केडीके कॉलेज ते घाट रोडपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे आणि बजाजनगर ते शंकरनगर सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. रेशीमबाग चौकापर्यंत सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तेथून घाट रोडपर्यंतच्या म्हणजेच ग्रेट नाग रोडचे काम गेल्या अडीच वषार्ंपासून रखडलेले आहे. या कामासाठी संबंधीत कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आला. शंकरनगर ते बजाजनगर मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. ग्रेट नाग रस्त्याची अवस्था फारच गंभीर असून लोकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. नितीन गडकरी यांचे निवासस्थान असलेल्या पूर्व नागपुरातील सिमेंटचे रस्ते अर्धवट स्थितीत असताना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातील रस्त्यांच्या कामांना झुकते माप दिले जात असल्याचे लोक बोलू लागले आहे. गडकरींच्या निवासस्थानी जाताना अनेकदा ग्रेट नाग रोडने जात असताना महापालिका प्रशासनाने अजूनही त्याची दखल घेतली नाही. शहरातील सिमेंट रस्त्यासाठी राज्य सरकारने ३०० कोटींची घोषणा केल्यानंतर त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात ६७ किमी सिमेंट रस्ते तयार करण्यात येणार आहे. त्यात ६७ किमी रस्त्यांपैकी सर्वात जास्त म्हणजे ५५ किलो मीटरचे रस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुधाकर कोहळे यांच्या मतदारसंघात आहे. उर्वरित मतदारसंघात केवळ ११ किलो मीटरचे रस्ते तयार करण्यात येणार आहे. त्यात पूर्व आणि मध्य नागपुरातील रस्त्यांचा समावेश आहे.
या संदर्भात महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले, रेशीमबाग ते घाट रोडवरील सिमेंट रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील कुठलेही कामे बंद नाही. मधल्या काळात काही तांत्रिक कारणामुळे काम रखडले असले तरी दोन्ही भागातील सिमेंट रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. आणखी सिमेंट रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे दटके म्हणाले.