मागील आठवडय़ात महापालिकेत आंदोलनावेळी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबु नागरे यांच्यासह चौघांना मंगळवारी अटक केली. या कारवाईचे राजकारण करण्याची संधी राष्ट्रवादीने दवडली नाही. फूल बाजाराच्या स्थलांतरावरून आधीच मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली असताना ही कारवाई पालिकेतील सत्ताधारी मनसेच्या दबावातून झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. नागरे यांना सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्याच्या पायरीचा राजकीय भाषणासाठी व्यासपीठ म्हणून वापर करून घेतल्याचे पहावयास मिळाले.
रस्त्यांची दुरावस्था, मोकाट कुत्र्यांचा वावर, भीमवाडी येथील रेंगाळलेली घरकुल योजना अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी आयुक्तांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पालिकेच्या सुरक्षारक्षकांशी झटापट केली. काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली. या प्रकरणी सुरक्षा अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर नागरे यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पथक मंगळवारी खुटवडनगर भागातील नागरे यांच्या संपर्क कार्यालयावर पोहोचले. पोलीस अटक करण्यासाठी आल्याचे समजल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. माध्यम प्रतिनिधी पोहोचेपर्यंत अटक करायला आलेली पोलीस यंत्रणाही अर्धा तास निमूटपणे बसून राहिली. माध्यम प्रतिनिधींचा लवाजमा पोहोचल्यावर नागरे यांनी वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीप्रमाणे स्वत:ला अटक करून घेतली.
ताफा पोलीस ठाण्याकडे रवाना होत नाही तोच अटकेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भुजबळ फार्मसमोरील मुंबई-आग्रा रस्त्यावरील सव्‍‌र्हिस रोडवर धडकले. परंतु याची आधीच कुणकुण लागल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याआधीच ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष शरद कोशिरे, सुनील बागूल या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ८० ते १०० कार्यकर्ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा झाले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व साहेबराव पाटील यांच्यासह इतरही अधिकारी ठाण्यात उपस्थित होते. असे असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील पायऱ्यांचा व्यासपीठ म्हणून वापर केला. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पगार यांनी त्याठिकाणी उभे राहून भाषण ठोकले. मनसेच्या दबावातून पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेच्या कार्यपद्धतीचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. ठाण्याच्या आवारात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्याच ताब्यात गृहखाते आहे.
पोलिसांनी दुपारी अटक केलेल्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली. काही महिन्यांपासून राष्ट्रवादी व मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. या पक्षांच्या नेत्यांकडूनही परस्परांवर शरसंधान केले जात आहे. त्यातय या कारवाईचेही राष्ट्रवादीने राजकीय भांडवल केल्याचे दिसत आहे.