05 April 2020

News Flash

नवी मुंबई महापालिका निवडणूक : सातबारा – राजकारण

प्रभाग क्रमांक तीन व दहा सोडल्यास वरील प्रभागांचा सर्व भाग हा झोपडपट्टीत येत असून या ठिकाणी काही नगरसेवकांचे बालेकिल्ले आहेत.

| April 10, 2015 12:11 pm

प्रभाग क्रमांक तीन व दहा सोडल्यास वरील प्रभागांचा सर्व भाग हा झोपडपट्टीत येत असून या ठिकाणी काही नगरसेवकांचे बालेकिल्ले आहेत. यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले देश आणि राज्य पातळीवरील निवडणुका लढल्यानंतर आता शहरातील निवडणूक लढत आहेत. त्यांनीच अनधिकृतरीत्या वसवलेल्या चिंचपाडा या प्रभागातून ते नशीब अजमावणार असून हा प्रभाग त्यांचा हुकमी पत्ता आहे. या प्रभागात त्यांचा प्रभाव कायम राहिल्याने तेथे ते किंवा त्यांनी उभा केलेला उमेदवारच निवडून आलेला आहे. याच प्रभागात पालिकेतील पहिल्या नगरसेविका मीना मोरे यांची हत्या झाली होती, तर चौगुले यांचा चुलतभाऊ सुनील चौगुले यांना नाहक प्राण गमवावे लागले होते. यानंतर प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेवक नवीन गवते व भाजपचे अमित वैती ही लढत एकतर्फी होणार आहे. चौगुले यांचे एके काळचे स्वीय साहाय्यक बहादूर बिष्ट हे प्रभाग क्रमांक आठमधून पुन्हा निवडणूक लढत असून राष्ट्रवादीचे रामअशिष यादव यांच्याबरोबर त्यांची लढत आहे. प्रभाग क्रमांक एक हा या शहरातील पहिला प्रभाग असून ठाण्याहून येताना त्याचे क्षेत्र आहे. मुकुंद कंपनीच्या आजूबाजूच्या या परिसरात ठाकूर कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याने गेली वीस वर्षे त्यांचा प्रभाव या प्रभागात राहिलेला आहे. या प्रभागाच्या शेजारी असलेला प्रभाग क्रमांक दोन रामनगर हा भाग माजी नगरसेवक किशोर गायकर यांचा आहे. त्यांची पत्नी या वेळी निवडणुकीत नशीब अजमावणार असून यापूर्वी ते व त्याची आई नगरसेविका होत्या. गायकर दिवंगत आनंद दिघे यांचे निकटवर्तीय होते, पण ते आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. चौगुले यांना ऐरोली दिघ्यात सहा प्रभागांची उमेदवारी देण्यात आली. त्यातील एक उमेदवारी साधना केणी या जगदीश गवते यांच्या बहिणीसाठी घेण्यात आली. केणी यांचा सामना प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रावादीच्या दीपाली गवते यांच्याबरोबर होणार आहे. इलटणपाडाचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनिल गवते विरुद्ध जगदीश गवते अशी लढत होणार असून अर्धा भाग हा या गवते कुटुंबाचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जमीनदार म्हणून या गवते कुटुंबाकडे पाहिले जाते. माजी नगरसेविका अपर्णा गवते व हरिष पांडे यांची लढत प्रभाग क्रमांक नऊमध्ये होणार आहे.
 सभागृह नेते अनंत सुतार यांची पत्नी शशिकला पहिल्यांदाच राजकारणात उतरल्या असून त्यांची लढत दिवंगत दीपक पाटील यांची बहीण सुषमा भोईर यांच्याबरोबर प्रभाग क्रमांक दहामध्ये होणार आहे. ऐरोली नाका, एमएसईबी कॉलनी, सेक्टर एक हा भाग या प्रभागात येतो. या लढतीला अंतर्गत वादाची किनार असून भोईर यांनी काही दिवसांपूर्वी सेनेत प्रवेश केलेला आहे.

२७ अर्ज छाननीत बाद
नवी मुंबई  : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता १११ प्रभागांसाठी ९१४ अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात २७ अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये डमी अर्जाचादेखील समावेश आहे. आता ८८७ उमेदवार िरगणात आहे. शुक्रवारी किती उमेदवार माघार घेणार आहेत याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अनेक उमेदवारांनी दोन अर्ज भरले असल्यामुळे त्यांचा डमी अर्ज बाद झाला आहे. बाद झालेल्या अर्जामध्ये अपक्ष अर्जदारांचा भरणा जास्त आहे. काँग्रेस, भाजप व शिवसेनेचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डमी उमेदवारांचा समावेश आहे. बाद झालेल्या अर्जामध्ये प्रभाग क्रमांक ३६ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुक्सार कुरेशी यांचा समावेश आहे. तीन अपत्ये असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे.

प्रभाग क्रमांक १ ते १० मधील समस्या
 गणपती पाडा येथील स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे.  पेट्रोल पंपाच्या बाजूला असणाऱ्या मैदानामध्ये डेब्रिजचे ढीग पडलेले आहेत. इलठण पाडा, यादव नगर, चिंचपाडा या ठिकाणी अनाधिकृतरीत्या बेसुमारपणे झोपडपट्टी वाढत आहे. नाले साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे त्यातून दरुगधी येत आहे. दिघा विभागाला एकच स्मशानभूमी आहे. इलठण पाडा, यादव नगर, चिंचपाडा, आनंद नगर या भागामध्ये एनएनएमटीच्या बसेस नसल्याने नाइलाजास्तव रिक्षाने प्रवास करावा लागतो. विष्णुनगर येथील डोंगरावर दगडखाणीची कामे सुरू असल्यामुळे धुळीने नागरिकांना त्रास होत आहे. दगडखाणीच्या येथे सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे जमिनीला हादरा बसत असल्यामुळे घरांच्या भिंतींना चिरा पडल्या आहेत, तर काही घरांचे पत्रे तुटले आहेत. अनधिकृत बांधकाम हे या नऊ प्रभागात पाचवीला पुजलेले आहे. पार्किंगसाठी पुरेशी अशी जागा नाही. प्रभागांमध्ये मैदानांची सोय नाही.

प्रभाग क्रमांक १ ते १० मधील प्रमुख लढती
प्रभाग क्रमांक १
प्रभागाचे नाव- ईश्वर नगर
लोकसंख्या- ८२४४
राष्ट्रवादी काँग्रेस- हेमलता ठाकूर
भाजप – उज्ज्वला झंझाड
प्रभाग क्रमांक २
प्रभागाचे नाव- रामनगर
लोकसंख्या- ९४३५
राष्ट्रवादी काँग्रेस- अनिता गायकर
शिवसेना- शुभांगी जगदीश गवते
प्रभाग क्रमांक ३
प्रभागाचे नाव- दिघा, गणपती पाडा,
लोकसंख्या- ११८४३
राष्ट्रवादी काँग्रेस – दीपाली गवते
शिवसेना- साधना किणी
काँग्रेस – सुधा आंबेकर
प्रभाग क्रमांक ४
प्रभागाचे नाव-
विष्णुनगर, साठेनगर, दिघा
लोकसंख्या- १०११५
राष्ट्रवादी काँग्रेस- नवीन गवते
भाजप – अमित वैती
प्रभाग क्रमांक ५
प्रभागाचे नाव- इलठण पाडा
लोकसंख्या- ११४७१
राष्ट्रवादी काँग्रेस-अनिल गवते
शिवसेना- जगदीश गवते
प्रभाग क्रमांक ६
प्रभागाचे नाव- यादवनगर
लोकसंख्या- १०९८५
राष्ट्रवादी काँग्रेस – संगीता यादव
भाजपा – सुवर्णा पाटील
प्रभाग क्रमांक ७
प्रभागाचे नाव- चिंचपाडा
लोकसंख्या- ९४७६
राष्ट्रवादी काँग्रेस – भास्कर मोरे
शिवसेना- विजय चौगुले
काँग्रेस- प्रभा मिश्रा
प्रभाग क्रमांक ८
प्रभागाचे नाव-
चिंचपाडा, गवतेवाडी
लोकसंख्या- ९६७१
राष्ट्रवादी काँग्रेस – रामआशीष यादव
शिवसेना- बहादुर बिस्ट
प्रभाग क्रमांक ९
प्रभागाचे नाव- नामदेव नगर, संजय गांधी नगर
लोकसंख्या- ८८४७
राष्ट्रवादी काँग्रेस-अपर्णा गवते
भाजप – हरीश पांडे
प्रभाग क्रमांक १०
प्रभागाचे नाव
ऐरोली, शिव कॉलनी, सेक्टर २०
लोकसंख्या- १०८६५
राष्ट्रवादी काँग्रेस-शशिकला सुतार
शिवसेना- सुषमा भोईर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 12:11 pm

Web Title: politics over navi mumbai municipal election
टॅग Politics
Next Stories
1 होऊ द्या चर्चा : खानावळी
2 उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
3 उरणच्या दहा वर्षीय जलतरणपटूची कामगिरी
Just Now!
X