निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाचा कलंक माथी घेऊन दोन पिढय़ा खपल्या. आज.. उद्या.. कृष्णामाई वावरात येईल या आशेवर भोळाभाबडा डोळे लावून बसला होता. सुदैवाने प्रतीक्षा संपली. देवीखडीच्या बोगद्यातून माणगंगा खो-यात वसलेल्या आटपाडी तालुक्याला कृष्णेचे पाणी मृगजळ न वाटता वास्तव वाटू लागले आणि राजकारणाची माशी शिंकली. टेंभूचं पाणी..पुजायचं कोणी.. या प्रश्नात काँग्रेस राष्ट्रवादीचा अंतर्गत संघर्ष उफाळून आला.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम टेंभू योजनेचे श्रेय काँग्रेसचेच असल्याचे दर्शविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेऊन उद्घाटन करण्याच्या तयारीत होते. मात्र या योजनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संपतराव देशमुख यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमासाठी कोणत्याही पातळीवर स्थान दिले गेले नाही.  योजनेचा पाठपुरावा करण्यात माजी आमदार राजेंद्र देशमुख, अनिल बाबर, अजित घोरपडे, पृथ्वीराज देशमुख आदी मंडळी अग्रभागी होती. टेंभू योजनेचे श्रेय जर या लोकांना मिळाले, तर भविष्यात विधानसभेसाठी अडचणी निर्माण होऊ  शकतात. तसेच विटय़ाचे आमदार सदाशिव पाटील यांच्या राजकीय विरोधकांना ताकद मिळू शकते. ही बाब लक्षात येताच टेंभू योजनेचा कार्यक्रम काँग्रेस मंडळींचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला.  
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार टेंभू योजनेचे दि. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन निश्चित करण्यात आले होते. तशा निमंत्रणपत्रिकाही तयार करण्यात आल्या होत्या. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेला आक्षेप योग्य माध्यमाद्वारे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला. पवार यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन टेंभूच्या उद्घाटनासाठी जातीने उपस्थित असल्याचे सांगत कार्यक्रमपत्रिकाच बदलली. त्यामुळे हा कार्यक्रम एक दिवस अगोदर निर्धारित करण्यात आला.
टेंभू योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे माहुली येथे उद्घाटन होत असल्याची निमंत्रणपत्रिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या जलसंपदा खात्याने तयार केली. निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्यासह विद्यमान लोकप्रतिनिधींची नावे छापण्यात आली. दोन्ही काँग्रेसअंतर्गत असलेला श्रेयवादाचा सुप्त संघर्ष निमंत्रणपत्रिकेवरून पुन्हा एकदा उफाळून आला. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुहूर्ताचा नारळ फोडणे काँग्रेसला आवश्यक होते. मात्र राष्ट्रवादीला केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे होते. हे श्रेय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला आवश्यक वाटत आहे. त्यातूनच हा श्रेयवादाचा वाद उफाळून आला.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या फोनाफोनीनंतर आवर्जून घेतलेल्या कार्यक्रमास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अनुपस्थिती दर्शविली. राष्ट्रवादीचे दुसरे नेते ग्रामविकासमंत्री जयंत पाटील वाढदिवस साजरे करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरत होते. मात्र त्यांनीही विटा-पलूसकडे येण्याचे टाळले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे सांगलीनजीक आष्टा येथे उपस्थित होते. तर आठवडामंत्री म्हणून ओळखले जाणारे आर. आर. पाटील जिल्ह्याबाहेर होते. या गोष्टी अनावधानाने झाल्या असे म्हणणे म्हणजे राजकीय मूर्खपणाच म्हणावा लागेल.
काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये टेंभू योजनेचे श्रेय उपटण्यासाठी एकीकडे सुंदोपसुंदी सुरू असताना पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाने सर्वसामान्यांच्या हस्ते कृष्णेचे पाणीपूजन घाणंद तलावात करून पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे असा नारा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीवेळी टेंभूचे पाणी चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत.