स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी २३ जानेवारीला चंद्रपूर, तर १५ फेब्रुवारीला यवतमाळ येथे मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर अकोला, गोंदिया, वाशिम, भंडारा व गडचिरोली येथे मतदान प्रक्रिया राबवून जनमताचा कौल जाणून घेतला जाणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला जनाधार नाही, हा आरोप केंद्र सरकारकडून वारंवार केला जात आहे, परंतु स्वतंत्र विदर्भ व्हावा, अशी प्रत्येक विदर्भवाद्यांच्या मनातील भावना आहे. नागपूर व अमरावती येथे झालेल्या जनमताच्या कौलमधून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता विदर्भ जॉईन्ट अ‍ॅक्शन समितीने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ात जनमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात २३ जानेवारी रोजी चंद्रपूर शहरात मतदान घेतले जाणार आहे. चंद्रपूर शहरातील जबाबदारी स्वत: जॉईन्ट समितीचे अ‍ॅड.वामनराव चटप यांच्याकडे आहे. चंद्रपूर शहरात त्यासाठी ठिकठिकाणी मतदान केंद्रे राहणार आहे. तेथे जाऊन लोकांना विदर्भाच्या बाजूने मतदान करायचे आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीला यवतमाळ येथे मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यवतमाळची जबाबदारी मंगल चिंडालिया व प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्यानंतर गोंदिया, अकोला, वाशिम, भंडारा व गडचिरोली शहरात मतदान घेतले जाणार आहे. गोंदियाची जबाबदारी छैलबिहारी अग्रवाल व रमेश ढोमणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, तर अकोला येथील जबाबदारी डॉ.श्रीकांत तिडके यांच्याकडे सोपविली आहे. विदर्भातील ३८ विविध संघटनांनी एकत्र येत विदर्भ जॉईन्ट अ‍ॅक्शन समिती तयार केली आहे.
या समितीच्या वतीने ही जनमत कौल जाणून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वप्रथम विदर्भातील आघाडीचे शहर असलेल्या अमरावती येथे १० ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात ८५ टक्के अमरावतीकरांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कौल दिला होता. त्यानंतर विदर्भाची राजधानी नागपूर शहरात मतदान घेण्यात आले. त्यात ९७ टक्के लोकांनी विदर्भाच्या बाजूने कौल दिला होता. अमरावती व नागपूर या दोन शहरात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता पूर्व व पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये मतदानाच्या माध्यमातून जनमत कौल घेतले जाणार आहे.