दूषित पाणी पुरवठय़ाबद्दल जिल्ह्य़ातील २२८ ग्रामपंचायतींना मागेच नोटिसा बजवाण्यात आल्या असल्यातरी पुन्हा १५९ गावांतील १७९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. पाणी टंचाईमुळे उद्भव कोरडे पडत आहेत व होणारा पुरवठाही दूषित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सर्वाधिक दुषित नमुने नगर तालुक्यात आढळले आहेत, नगर शहरातील महापालिका सीना नदीत प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडत आहे, त्याच्या परिणामातून १८५ नमुन्यांपैकी ३८ दुषित आढळले आहेत. जिल्ह्य़ात घेण्यात आलेल्या २ हजार १५६ नमुन्यांपैकी १७९ दुषित असल्याचे आढळले आहेत. गेल्या महिन्यांतच जिल्ह्य़ातील २२८ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाने ‘रेड कार्ड’ (नोटिसा) बजावले होते. तरीही जिल्ह्य़ातील दुषित पाणी पुरवठय़ाचे प्रमाण ८.३० टक्के आहेच. अर्थात तीन महिन्यांपुर्वी हेच प्रमाण ११ टक्क्य़ांवर पोहचले होते.
अकोल्यात २०४ पैकी १८, जामखेड १०४ पैकी ६, कर्जत १३७ पैकी ७, कोपरगाव ७७ पैकी ७, नेवासे १५७ पैकी ४, पारनेर ११८ पैकी ४, पाथर्डी १८८ पैकी १७, राहाता १०८ पैकी ५, राहुरी १२५ पैकी ८, शेवगाव १६२ पैकी ९, संगमनेर १९० पैकी १३, श्रीगोंदे ३०८ पैकी ३६ व श्रीरामपुर ९३ पैकी ७ नमुने आरोग्य विभागाच्या तपासणीत दूषित आढळले.
जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीच्या सभापती मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत जिल्ह्य़ातील दुषित पाणी पुरवठय़ाबद्दल चिंता व्यक्त करतानाच आवश्यक त्या सुचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेस सदस्य डॉ. स्वाती कानडे (बोरुडे), सुनीता बनकर, भगवान मुरुमकर, मंदा भोसले, चित्रा बर्डे, डॉ. भास्करराव खर्डे, राहुल जगताप आदींनी सूचना केल्या.
प्रथमोपचारासाठी रोहयोचे सर्वेक्षण
सध्या दुष्काळामुळे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरु आहेत. या कामांवर प्रथमोपचाराच्या साहित्याची पेटी ठेवणे बंधनकारक आहे, मात्र असे साहित्य उपलब्ध नसल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे या कामांवर प्रथमोपचाराची पेटी उपलब्ध आहे की नाही, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने करावे, असे श्रीमती राजळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.