०   पीयुसी केंद्रधारकांची मनमानी
०   ऑटोरिक्षांमध्ये सर्रास रॉकेलचा वापर

या जिल्ह्य़ात केवळ उद्योगच नाही, तर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळेही प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. दरवर्षी या जिल्ह्य़ातील रस्त्यांवर ३५ हजार नवीन वाहने धावत असल्याने ही समस्या निर्माण झालेली आहे. वाहनांची पीयूसी करणे आवश्यक असतांना ती केली जात नसल्याची माहिती आहे.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीपथावर असलेल्या या जिल्ह्य़ात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे वायू प्रदूषणातही भर पडत आहे. या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांना पीयुसी अनिवार्य करण्यात आली आहे, मात्र पीयुसी प्रमाणपत्र देतांना अनेक घोळ केला जात आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपलब्ध माहितीनुसार २००६ ते २००७ यावर्षी १ लाख ९५ हजार ९५२, २००७ ते २००८ यावर्षी २ लाख १४ हजार ६१९, २००८ ते २००९ यावर्षी २ लाख ३२ हजार ७८७, २००९ ते २०१० यावर्षी २ लाख ५४ हजार ५२४, २०१० ते २०११ यावर्षी २ लाख ८१ हजार ७६४, २०११ ते २०१२ यावर्षी ३ लाख १३ हजार ८७२ वाहनांची नोंदणी झाली आहे. २००६-०७ या वर्षांपासून वाहनांची माहिती घेतली असता २००६-०७ यावर्षी १८ हजार ६३७ नवीन वाहने रस्त्यांवर आली. त्यानंतर २००७-०८ यावर्षी १९ हजार ३५४, २००८-०९ मध्ये १८ हजार ४३१, तर २००९-१० मध्ये २२ हजार १२ नवीन वाहने रस्त्यांवर आली. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक म्हणजे ६० हजार नवीन वाहने रस्त्यावर आली आहेत. यात २०१०-११ या वर्षांत २७ हजार ८४६, तर २०१२ मध्ये ३२ हजार ९८२ नवीन वाहनांची भर पडली आहे. मोटार वाहन नियम १९८९ च्या कायद्यानुसार वाहनांची नोंदणी केल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष वगळता दर सहा महिन्यांनी पीयुसी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. वाहन प्रदूषणमुक्त आहे, याकरिता ही तपासणी करण्यात येते. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची एक्स्झॉस्ट गॅस अ‍ॅनालायझर आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची स्मोक अ‍ॅनालायझर मशिनद्वारे तपासणी करण्यात येते. अचूक तपासणीसाठी या मशिनचा दर्जाही चांगला असावा लागतो. या मशिनद्वारे वाहनांतून निघणारा धूर आणि विषारी वायु यांचे प्रमाण मोजण्यात येते. हे प्रमाण योग्य असल्यास पीयुसी प्रमाणपत्र द्यायचे असते, परंतु पीयुसी केंद्रामार्फत या नियमांचे सर्रास उल्लघंन केले जात आहे. वाहनांमधून निघणाऱ्या कॉर्बन मोनाक्साईड हा वायू मानवी शरिरात प्रवेश करून रक्तामार्फत सर्व अवयवात पोहोचतो. तो अत्यंत विषारी असून याच्या संर्पकात आल्यास चक्कर येणे, डोकेदुखी हा त्रास उद्भवतो व विचारक्षमता व कार्यक्षमता कमी होते. वाहनातून निघणारे अतिसूक्ष्म धुलीकण श्वसनामार्फत फुफफुसात जातात. फुफफुसाच्या रचनेमुळे ते दिर्घकाळ साठून राहतात. हे कण विविध प्रकारच्या हानीकारक घटकांमुळे बनले असल्यामुळे रक्तामध्ये मिसळून रक्त दूषित करतात व त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात. ऑटोरिक्षांमध्ये रॉकेलचा वापर बंधनकारक असला तरी बऱ्याच ऑटोमध्ये तो केला जात आहे. ऑटोरिक्षा संघटनांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही. रॉकेलमधून सल्फर डायॉक्साईड निर्माण होते. हा वायू पाण्यात विरघळत असल्याने शरिरात याचे प्रमाण जास्त झाल्यास कफ व सर्दीचा त्रास वाढतो. या आकडेवारीवरूनही दरवर्षी वाहनांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात येते.  पीयुसी केंद्रामार्फत पीयुसी प्रमाणपत्र व्यवस्थित देण्यात येते अथवा नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची आहे, मात्र हे
खाते आपली जबाबदारी नीट पार पाडत नसल्याने पीयुसी केंद्रधारकांचा मनमानी कारभार सुरू आहे.