पैसे पाण्यात टाकणे म्हणजे काय याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर गेल्या काही वर्षांत वालधुनी शुद्धीकरण प्रकल्पासाठी खर्च झालेल्या निधीचे उदाहरण देता येईल. श्रीमलंग डोंगररांगांमधून उगम पावून कल्याणच्या खाडीला मिळणाऱ्या या नदीचे आता औद्योगिक व घरगुती सांडपाण्यामुळे आता अक्षरश: गटारगंगेत रूपांतर झाले आहे. एका वाहत्या प्रवाहाची अशी दुर्दशा होण्यात स्थानिक प्रशासन आणि शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बेफिकिरीबरोबरच त्या काठी राहणाऱ्या रहिवाशांची उदासीनताही कारणीभूत आहे. अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिवमंदिर हे वालधुनी नदीकाठी बांधण्यात आलेय, हे आता कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. कारण शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या या नाल्याची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. वालधुनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेच, पण नऊ शतकांपूर्वी बांधण्यात आलेले हे प्राचीन वास्तुवैभवही धोक्यात आले आहे.
मध्यंतरीच्या काळात तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मंदिर परिसर सुभोभीकरणासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला होता. मात्र त्या योजनेचे कोणतेही दृश्यपरिणाम या परिसरात आढळून येत नाहीत. ९५४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे अप्रतिम वास्तुशिल्प पाहण्यासाठी जगभरातून येथे पर्यटक येतात, मात्र त्यांच्यासाठी येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. इतक्या वर्षांत एखादे साधे स्वच्छतागृहही येथे उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. मंदिराभोवतीच्या परिसरातील अतिक्रमणांमुळे सुभोभीकरण प्रकल्प राबविता येत नसल्याची कारणे शासकीय अधिकारी देतात, पण वालधुनी नाल्यातून वाहणाऱ्या काळ्या पाण्याचा का बंदोबस्त करता येत नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सध्या गळक्या बंधाऱ्यातून हे रसायनमिश्रित पाणी झिरपून मंदिराचा पाया झिजत असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

गेल्या अर्धशतकात मंदिराची बरीच हानी
साडेनऊशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराची साठ-सत्तर वर्षांपूर्वीची छायाचित्रे पाहता त्या वेळच्या तुलनेत आता शिल्पांची बरीच हानी झाल्याचे आढळून येते. प्रदूषणामुळे दगडांची झीज होत असल्याचे दिसते. नाल्यातून वाहणारे रसायनमिश्रित पाणी तातडीने रोखले पाहिजे, कारण ते झिरपून मंदिराचा पाया ठिसूळ होऊ शकतो.
डॉ. कुमुद कानिटकर, अभ्यासक

स्वच्छता मोहिमेसाठी
पालिकेचा पुढाकार
पुरातत्त्व खात्याने घालून दिलेल्या मर्यादांच्या अधीन राहून मंदिर परिसर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन शक्यत्या सर्व उपाययोजना करीत आहे. गेल्या आठ दिवसांपासून नालेसफाईची कामे सुरू आहेत. नाल्यातील गाळ उपसला जात आहे. रस्ते, पथदिवे, धर्मशाळा दुरुस्ती, बागेचे सुशोभीकरण, मुलांसाठी खेळणी आदी कामे तातडीने हाती घेतली गेली आहेत. नागरिकांनीही या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. औद्योगिक विभागातून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे वालधुनी नाला प्रदूषित होतो. यासंदर्भात खासदारांच्या माध्यमातून पर्यावरण विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली.