शासनाकडून निधी हाती पडल्याने नाशिक नगरीत सिंहस्थाच्या कामांनी काहिसा वेग पकडला असला तरी नियोजनातील अभाव मात्र पदोपदी निदर्शनास येत आहे. अतिशय दाटीवाटीच्या मध्यवस्तीत भरणाऱ्या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने कोणत्याही आपत्कालीन संकटांचा तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज राखणे अनिवार्य आहे. तथापि, आरोग्य व्यवस्थेचे नियोजन करताना नदीच्या अलीकडील आणि पलीकडील व्यवस्थेचा विचारच झालेला नाही. परिणामी, नदीच्या काठावर एका भागात आरोग्य व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू असली तरी पलीकडील म्हणजे दुसऱ्या भागात मात्र आरोग्य व्यवस्थेची वानवा राहणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यास केवळ वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने त्या अनुषंगाने तयारी करण्यास बहुतेक यंत्रणांनी प्राधान्य दिले आहे. मागील सिंहस्थात जवळपास ५० लाख भाविक सहभागी झाले होते. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर, लाखो भाविकांच्या आरोग्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आरोग्य विभाग आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यावर राहणार आहे. सिंहस्थासाठी मागील वर्षी राज्य शासनाने महिला व पुरूषांसाठी १०० खाटांच्या रुग्ण कक्षाला मान्यता दिली होती. त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा शासकीय रुग्णालयात या कक्षाची उभारणी केली जाणार आहे. महाापालिकेने कथडय़ातील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय, नाशिकरोडचे बिटको रुग्णालय, मेनरोडवरील अण्णासाहेब दातार रुग्णालय, गंगापूर हॉस्पीटल तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयाची व्यवस्था बळकट करण्यावर लक्ष दिले आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक एकत्र येणार असल्याने साथीचे व तत्सम आजारांचा सामना करण्यासाठी अतिरिक्त खाटांची उपलब्धता करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा विचार करताना नदीच्या दोन्ही बाजुकडील क्षमतेचा विचार केला गेलेला नाही. म्हणजे, नदीच्या पलीकडील भागात जिथे विविध आखाडय़ांचे साधु-महंत व भाविकांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव राहणार आहे, त्या भागातील आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. सिंहस्थ काळात फिरते दवाखाने व तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय पथकांची सज्जता ठेवली जाणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर तातडीने उपचार करता येईल इतक्या खाटांची व्यवस्था असणाऱ्या सुसज्ज रुग्णालयांची कमतरता भासणार आहे. सध्या सिंहस्थासाठी आरोग्य व्यवस्थेची जी कामे सुरू आहेत ती सर्व नदीच्या अलीकडील भागात आहे. मागील सिंहस्थात चेंगराचेंगरी होऊन ३४ भाविकांचा मृत्यू झाला तर शेकडो भाविक जखमी झाले होते. शाही स्नानाच्या दिवशी नदीच्या अलीकडे व पलीकडे घाटाकडे जाणारे सर्व रस्ते लाखो भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. त्यामुळे अंतर्गत भागातील रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे भाग पडते. या स्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास जखमींना उपचारासाठी नदीच्या एका भागातून दुसऱ्या भागातील रुग्णालयात नेणे अवघड ठरू शकते. परंतु, या मुद्याचा आरोग्य यंत्रणांना विसर पडल्याचे दिसते. नदीच्या पलीकडील भागात आडगाव येथे मविप्र शिक्षण संस्थेचे डॉ. वसंतराव पवार रुग्णालय तसेच महापालिकेचे १०० खाटांचे इंदिरा रुग्णालय इतकीच व्यवस्था आहे. नदीच्या दुसऱ्या भागातील आरोग्य व्यवस्थेचा विचार करता ही व्यवस्था अतिशय तोकडी असल्याचे लक्षात येते. या मुद्याचा शासकीय यंत्रणांनी गांभिर्याने विचार केलेला नाही. त्यामुळे या संदर्भात विचारणा केल्यावर परस्परांकडे त्याची जबाबदारी ढकलण्यात धन्यता मानली जात आहे.

स्वच्छतेची जबाबदारी आरोग्य विभागाकडे
आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर गोदाकाठ, तपोवन जेथे भाविकांची गर्दी जास्त होते, त्या ठिकाणी १०० सफाई कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता निरीक्षक आणि विभागीय स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. कचरा उचलण्यासाठी गाडय़ा ठेवण्यात येतील. स्वच्छतेशी संबंधित संपूर्ण व्यवस्था महापालिकेचा आरोग्य विभाग पाहील. चेंगराचेंगरी वा अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी नगररचना तसेच संबंधित विभागाकडे राहील.
– डॉ. सुनील बुकाणे (महापालिका आरोग्याधिकारी)

आरोग्य विभागाची जबाबदारी जिल्हा रुग्णालयापुरतीच
आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा शासकीय रुग्णालयाने मागणी केलेला महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र अशा १०० खाटांच्या रुग्ण कक्षाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याची प्रक्रिया निविदेच्या टप्प्यात आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आपली जबाबदारी जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत मर्यादित आहे. इतर भागातील आरोग्य व्यवस्थेचा विषय
महापालिकेच्या अखत्यारीत येतो.
– डॉ. रवींद्र शिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक

रुग्णालयाची जागा परत घेणार
कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाचे नियोजन सुरू आहे. आरोग्य विभागाची भिस्त महापालिकेचे रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहे. तसेच गोदाकाठ ते तपोवन आणि अन्य परिसर असे २० ठिकाणे ठरविण्यात आले आहे. तिथे आरोग्य विभागातर्फे प्राथमिक उपचार तसेच आवश्यकता भासल्यास विशेष उपचार केले जातील. तपोवन परिसरात एक रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाची जागा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाला भाडेतत्वावर देण्यात आली आहे. सिंहस्थाआधी ही जागा ताब्यात घेण्यात येईल.
– डॉ. बी. आर. गायकवाड (वैद्यकीय अधीक्षक, महापालिका)