पालिकेच्या डोंबिवलीतील बालभवनमधील कलादालनातील सुशोभित प्लॅस्टर ऑफ पॅरिस मंगळवारी दुपारी कोसळले. बालभवनमध्ये कार्यक्रमांची रेलचेल नसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. बालभवन पावसाच्या धारांनी गळत असूनही त्याकडे पालिकेच्या शहर अभियंत्यांचे अजिबात लक्ष नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
बालभवन हे शिवसेनाप्रमुख तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते. शहरातील बालगोपाळांना मौजमजा, खेळण्यासाठी, कलागुण विकसित करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी एक व्यवस्था असावी म्हणून रामनगरमध्ये चार वर्षांपूर्वी आनंद बालभवनची उभारणी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या बालभवनमध्ये पावसाच्या धारा लागलेल्या आहेत. या वास्तुच्या देखभाल दुरुस्तीकडे निष्क्रिय व सुस्त म्हणून ठपका असलेले शहर अभियंता पाटीलबुवा कारभारी यांचे लक्ष नसल्याने ही सर्व परिस्थिती उद्भवली असल्याची टीका होत आहे.
बालभवन ही वास्तू राजकीय हेवेदावे, प्रशासनातील गोंधळामुळे कोणत्याही संस्थेला चालविण्यात देण्यात आलेली नाही. राजकीय व्यक्ती वजनाचा वापर करून या वास्तूत फुकट कार्यक्रम उरकून घेत आहेत असे सांगण्यात येते. बालभवनमधील वाचनालय, नृत्य कक्ष, सभागृहाची दुरवस्था झाली आहे. मिनी थिएटरमध्ये पावसाच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे फर्निचर, भिंती खराब होत आहेत. सर्व पक्षीय पदाधिकारी पालिकेतील मोठी निविदा, त्यामधील टक्केवारी, अधिकाऱ्यांचे खुर्चीपूजन करण्यात दंग असल्याने त्यांना या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसते. आयुक्त शंकर भिसे यांचा वचक नसलेला संथगती कारभारही या गोंधळात भर घालत असल्याची टीका होत आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या गंभीर विषयाची दखल घेण्याची मागणी होत आहे.