कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे दिला जाणारा ‘कलायात्री पुरस्कार’ यंदा या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. इंडियन डेअरी असो. दिल्लीचे उपाध्यक्ष अरुण नरके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.    सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून १ मार्चला राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी ४.३०ला पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळय़ानंतर अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या कार्यवाह सीमा जोशी या अमरापूरकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती राजदर्शन दानवे यांनी या वेळी दिली. पत्रकार परिषदेस जयश्री दानवे, सुधीर पेटकर आदी उपस्थित होते.
पाच तपांहून अधिक काळ अभिनयकलेची सेवा करून मूक चित्रपटांपासून बोलपटांपर्यंत रुपेरी पडदा व रंगभूमीवर कधी दिग्दर्शक, तर कधी खलनायक म्हणून छाप उमटविणारे कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे दरवर्षी १ मार्चला दानवे परिवारातर्फे ‘कलायात्री पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. गेली दोन वर्षे हा पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी दिलीप प्रभावळकर व ज्येष्ठ चित्रपट-नाटय़ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांना देण्यात आला आहे.