द अ‍ॅन्टवर्प पोर्ट, अ‍ॅन्टवर्प शहर, द रॉयल म्युझियम ऑफ फाइन आर्ट्स आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने सतराव्या शतकातील अमूल्य चित्रांचा ‘फ्लेमिश’ ठेवा पाहण्याची संधी मुंबईकराना उपलब्ध झाली आहे. वस्तूसंग्रहालयात काही निवडक चित्रांचे आणि मुद्राचित्रांचे प्रदर्शन २८ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पीटर पॉल, रुबेन्स, अँथनी व्हर्न डेक, याकोब योर्दास, दावीद ननीअर्स, यंग ब्रगल या दिग्गज चित्रकांरासह अन्य चित्रकारांची चित्रेही प्रदर्शनात पाहायला मिळतील.
युरोपचे प्रवेशद्वार असलेल्या अ‍ॅन्टवर्प बंदराचे भारतातील सर्वात मोठय़ा सागरी बंदराशी अर्थात मुंबईशी व्यापारी आणि अन्य कारणांनी दीर्घकाळ संबंध राहिले होते. अ‍ॅन्टवर्प येथील ‘फ्लेमिश’ ठेवा भारतात पहिल्यांदाच या प्रदर्शनाच्या निमित्ताने रसिकांसमोर उलगडला जाणार आहे. चित्रप्रदर्शनात इतिहास या विषयासह निसर्गचित्रे, स्थिरचित्रे, व्यक्तिचित्रे, ग्राफिक्स आदी विषयांवरील २८ चित्रे व २५ मुद्राचित्रे पाहायला मिळतील. प्रदर्शन २८ नोव्हेंबरपासून रसिकांसाठी खुले होत असून मंगळवारी प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना हे प्रदर्शन दाखविण्यात आले. ही सर्व चित्रे कॅनव्हासवरील तैलचित्रे आणि ताम्रपटावर रेखाटण्यात आली असून ती सर्व सतराव्या शतकातील दिग्गज चित्रकारांनी काढलेली आहेत.
चित्रांबरोबरच या चित्रांचे प्रींट्स (मुद्राचित्रे)ही प्रदर्शनात असून यात पीटर पॉल रुबेन्स (पुराचा कोप शमविणारा नेपच्युन), कार्नेलिस द वॉस (एक कौटुंबिक चित्र), थिओदोर व्हंन थुल्टन व पीटर पॉल रुबेन्स (मक्र्युरीचा रंगमंच), पीटर पॉल रुबेन्स व यंग ब्रगल-पहिला (ख्रिस्ताच्या मृत्यूचा शोक), दावीद तनीअर्स (धुम्रपान करणारे लोक)या बरोबरच पीटर पॉल रुवेन्स आणि पॉल्स पॉंन्टिअल (वृद्ध स्त्री, मुलगा आणि मेणबत्ती), पीटर क्लास सॉरमन (पाणघोडा आणि मगरीची शिकार), यंग ब्रगल (नदी) यांच्या चित्रांचा समावेश आहे.  छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय, प्रेमचंद रॉयचंद गॅलरी, पहिला मजला येथील सकाळी १०. १५ ते सायांकळी ६ या वेळेत हे चित्रप्रदर्शन रसिकांना पाहता येणार आहे. हे प्रदर्शन १३ फेब्रुवारी २०१४ पर्यंत सुरू राहणार आहे.