* २६ विद्यार्थ्यांना त्रास
* मुख्याध्यापिका निलंबित
* बचत गटाचा ठेका रद्द
महापालिकेच्या एका शाळेतील २६ हून अधिक विद्यार्थ्यांना खिचडी खाल्ल्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यातील गंभीर अशा नऊ जणांना जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीतून विषबाधा होऊन हा प्रकार घडल्याचे खुद्द महापौरांनी मान्य केले असले तरी शिक्षण मंडळाने त्यासाठी दुषित पाणी जबाबदार असल्याचा दावा केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित करतानाच संबंधित बचत गटाचा खिचडी बनविण्याचा ठेकाही रद्द करण्यात आला आहे. पालिकेतील शाळांमध्ये अतिशय अस्वच्छ जागेत खिचडी बनविली जात असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
जुन्या नाशिकमधील मधली होळी परिसरातील शाळा क्र. ६२ मध्ये ही घटना घडली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे खिचडीचे वाटप करण्यात आले. खिचडी खाल्ल्यानंतर त्यांना अचानक मळमळ होऊ लागली. काही जणांना उलटय़ा सुरू झाल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली. हे वृत्त पालकांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली. अधिक त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना याच भागातील जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये जुनेद इब्राहिम शेख (११), साक्षी रमेश थापा (१०), सोनम रमेश थापा (१०), पूजा थापा (८), सुमन वाघमारे (५). आक्सा हनीफ शेख (१२), कुणाल जाधव (११), अरबाज बिलाल शेख (१२), अक्षय सकट (१०) यांचा समावेश आहे. प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
खिचडीतून झालेल्या विषबाधेमुळे हा प्रकार घडल्याचे मान्य करत त्यांनी या प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा रावळ यांना निलंबित करण्याचे तसेच ज्या बचत गटाकडे खिचडी बनविण्याचा ठेका होता, तो ठेकाही रद्द करण्याचे आदेश काढले. महापौरांकडून विषबाधा घडल्याचे मान्य केले जात असले तरी शिक्षण मंडळाचे अधिकारी मात्र हा प्रकार खिचडीमुळे नव्हे तर बांधकामासाठीच्या टाकीतील पाणी पिण्यामुळे घडल्याचे सांगत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा विषबाधेचा प्रकार नसल्याची माहिती दिल्याचे उपासनी यांनी ‘नाशिक वृत्तान्त’ला सांगितले. असे असले तरी खिचडीचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. त्याचा अहवाल पुढील आठ ते दहा दिवसात प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील पालिकेच्या सुमंत नाईक शाळेस काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांनी भेट देऊन खिचडी बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळाची पाहणी केली. त्यावेळी निकृष्ट दर्जाचा तांदूळ वापरला जात असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. अतिशय अस्वच्छ जागेत खिचडी बनविण्याची ही प्रक्रिया पार पाडली जाते. त्याची परिणती विषबाधेसारख्या प्रकारात होत असल्याचे छाजेड यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.