शरिरातील सूक्ष्म पेशींच्या स्तरावर होत असलेल्या वैज्ञानिक संशोधनामुळे आता कर्करोगाचे अचूक निदान करणे व व्यक्तिगणिक व कर्करोगाच्या उपप्रकारानुसार उपचार करणे शक्य होणार आहे. कर्करोगाचे योग्य नियंत्रण करून रुग्णांचे आयुष्यमान वाढवणे व त्यांना सामान्य आयुष्य जगता येणे आधुनिक संशोधनामुळे शक्य होणार असून तशा प्रकारच्या उपचारांना आता प्रारंभही झाला आहे.
कर्करोगावर उपचार करण्यासाठी तो कुठल्या प्रकारे शरिरात वाढत आहे, हे पाहणे व ती जागा शोधून मग त्यावर उपचार करणे महत्त्वाचे असते. कर्करोग तयार होणे व तो पसरणे या दोन्ही टप्प्यांवर त्यात जनुकीय बदल झालेले असतात. काही वर्षांंपूर्वीपर्यंत कर्करोग झालेला भाग कापून काढावा लागत असे. त्यानंतर किरणांच्या सहाय्याने केमो थेरपी केली जाऊ लागली. मात्र, या दोन्ही पध्दतीत सरधोपट उपचार करावा लागत असे. आता संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारात अधिक अचूकता आणली आहे. पंधरा वर्षांपूर्वी चौथ्या टप्प्यापर्यंत रुग्ण गेला की, त्याला परत पाठवावे लागत असे. आता कर्करोगाचा कुठला प्रकार, उपप्रकार आहे, शरिरात काय बदल होत आहे, त्याला अनुसरून उपचार पध्दती ठरवली जाते. एकाच प्रकारचा कर्करोग असला तरी, अगदी प्रत्येक रुग्णाकरिता वेगळी उपचार पध्दती ठरवता येणे आता शक्य झाले आहे.
पूर्वी रुणांची माहिती ढोबळमानाने ज्या पध्दती ठरल्या आहेत, त्यानुसार गोळा केली जात असे. या क्षेत्रात झालेल्या नवीन संशोधनांमुळे अधिकाधिक सूक्ष्म पातळीवर जाऊन कर्करोगांच्या पेशींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. या पेशींमध्ये काय बदल घडून येत आहेत, त्यांचा इतर पेशींवर काय परिणाम होत आहे, हे अभ्यासणे आता शक्य झाले आहे. तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की, या सगळ्या घडामोडींच्या नोंदी ठेवणे आपल्याला शक्य होऊ लागले आहे. उपचार केल्यानंतर कर्करोग बरा होऊ शकतो किंवा तो उलटूनही येऊ शकतो. रक्तातील कोटय़वधी पेशींमधून कर्करोगाच्या पेशी शोधून काढून, त्यांच्यात काय बदल होत आहेत, हे तपासून बघणे नवीन संशोधनामुळे शक्य होणार आहे. त्यातूनच मग कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो की नाही, याचा अंदाज वर्तविता येणार आहे, अशी माहिती नागपुरातील प्रख्यात कर्करोग विशेषज्ञ डॉ. आनंद पाठक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.  
आपल्या शरिरात डीएनए व आरएनए असतात व हे सूक्ष्म आरएनए दोन कर्करोगाच्या पेशींमध्ये संबंध प्रस्थापित करीत असतात. या सूक्ष्म आरएनएचा अभ्यास करून रुग्णाच्या शरिरात नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न शास्त्रज्ञ करू लागले आहेत. आता अभ्यासाकरिता पूर्ण पेशींचीही  गरज भासणार नसून नवीन संशोधनानुसार केवळ डीएनए किंवा आरएनए यांचा अभ्यास करूनही कर्करोगाच्या तीव्रतेसंबंधी निदान करता येणार आहे. शरीराची प्रतिकारक्षमता कर्करोगाला शरिरात का पसरू देते, यासंदर्भातील संशोधनही सध्या सुरू आहे. प्रतिकारशक्तींचे काम शरीराबाहेरील पेशींना शोधून काढण्याचे असते, परंतु कर्करोग जेव्हा होतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिकार यंत्रणा बाहेरील पेशींना ओळखू शकत नाही, याचे कोडे विज्ञानाला पडले होते व हळूहळू आता ते उलगडू लागले आहे. त्यामुळे आता केवळ ढोबळमानाने उपचार न करता कर्करोगावर अचूक उपचार करणे शक्य होणार आहे.
कर्करोग हा बदलत जाणारा आजार आहे व त्यामुळे एकाच प्रकारची उपचारपध्दती सदासर्वकाळ उपयोगात आणता येत नाही. प्रत्येक टप्प्यावर कर्करोगाचे स्वरूप उलगडून त्यावर उपचार करणे हे विज्ञानाचे स्वप्न होते व त्या दिशेने बरीच वाटचाल झाली आहे. फुफ्फुसांचा किंवा स्तनांचा कर्करोग याबाबत त्यांचे पोटप्रकार जाणून घेऊन उपचार करता येणार आहेत. सूक्ष्म पातळीवर संशोधन सुरू झाल्यास, कर्करोगाचे निदान लवकर होण्यास मदत होणार आहे व त्यामुळे उपचारांना लवकर सुरुवात करता येणार आहे.
या व्यतिरिक्त रक्तदाब किंवा मधुमेह असणारा रुग्ण जसा सामान्य आयुष्य जगू शकतो, तसेच आयुष्य कर्करोग असणाऱ्यालाही जगता आले पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. कर्करोगाला नियंत्रित करून रुग्णाचे आयुष्यमान कसे वाढविता येईल, याकरिता विज्ञानाचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातही अशी सगळी औषधे व उपचारपध्दती उपलब्ध आहे, असेही डॉ. पाठक यांनी सांगितले.