महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग समित्यांच्या बैठकांद्वारे वातावरण निर्मित आघाडी घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून आता पथनाटय़ाद्वारे शहरातील गैरव्यवस्थांचा पंचनामा मांडण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी या मोहिमेला प्रारंभ झाला.
मनसेचा सर्व रोख प्रामुख्याने शिवसेनेच्याच विरोधात आहे. गेल्या २५ वर्षांपासून आमदारकी हातात ठेवूनही शहर विकासातील निष्क्रियताच त्याला कारणीभूत असल्याचा आरोप मनसेने केला असून हीच संकल्पना केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थी आघाडीने त्यावर पथनाटय़ बसवले आहे. कापड बाजारातील भिंगारवाला चौकात आज त्याचा प्रारंभ झाला. शहरातील विविध भागांत ही पथनाटय़े सादर केली जाणार आहेत.
शहरातील लोकप्रतिनिधीला पडलेला नागरी प्रश्नांचा विसर, खराब रस्ते, वीज, पाणी, एकीकडे सुरू असलेली ‘संपूर्ण सुरक्षेची भाषा’ आणि दुसरीकडे होणारे महिला-मुलांच्या छेडछेडीचे प्रकार आदी गोष्टींवर या पथनाटय़ाद्वारे भाष्य करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून नगरकर विविध यातना सहन करीत असून त्याला सर्वस्वी शिवसेना-भाजपच जबाबदार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. नगरकरांना आता मनसेचा सक्षम पर्याय उपलब्ध असल्याचे संघटनचे शहराध्यक्ष सुमित वर्मा यांनी सांगितले.
विद्यार्थी आघाडीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जालिंदर शिंदे, प्रशांत टेमक यांच्या संकल्पनेतून पथनाटय़ाची निर्मिती करण्यात आली आहे.