गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास असणाऱ्या ढिवर, कहार, भोई, केवट समाज बांधवांचे आदर्श व दैवत एकलव्य यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने भारत सरकारच्या सूचना व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार असून, सडक अर्जुनी तालुक्याच्या सौंदड येथे २७ डिसेंबरला होत असलेल्या मत्स्य प्रदर्शन व तंत्रज्ञान शिबिरात त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
महाभारतात गुरू द्रोणाचार्याला गुरुदक्षिणेत हाताचा अंगठा कापून देणारे प्रसिद्घ, शूर, धाडसी धर्नुधारी एकलव्य हे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ढिवर, कहार, भोई, केवट समाज बांधवांचे आदर्श व पूज्यनीय आहेत. ढिवर, कहार, भोई, केवट समाज बांधव तसेच त्यांच्या संघटनांनी केंद्रीय अवजड व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे एकलव्य यांच्यावर डाक तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी केली होती. समाज बांधवांची ही मागणी लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री पटेल यांनी भारत सरकारच्या सूचना व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून एकलव्यावर डाक तिकीट प्रकाशित करण्याची मागणी लावून धरली. सूचना व माहिती तंत्रज्ञान मंत्री मिलिंद देवरा यांना देशातील भोई व ढिवर समाजाची संख्या त्यांची स्थिती पटेल यांनी समजावून दिली. एकलव्य यांच्यावर डाक तिकीट प्रकाशित केल्यास समाजात प्रेरणा निर्माण होईल, अशी भूमिका पटेल यांनी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना प्रभावीपणे समजावून सांगितली. त्यांनी याची दखल घेऊन शेवटी सूचना व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून एकलव्य यांच्यावर डाक तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. एकलव्य यांच्यावरील डाक तिकीट प्रकाशन २७ डिसेंबरला सौंदड येथे विदर्भातील मच्छिमार संस्था, मच्छिमार संघ व मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मंडळींना मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्याच्या हेतूने आयोजित मत्स्यप्रदर्शन व तंत्रज्ञान शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.