विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघटनेने देशव्यापी संप पुकारला आहे. या आवाहनानुसार नागपूर ग्रामीणमधील जवळपास बाराशे टपाल खात्याचे कर्मचारी उद्या, मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहे. या संपामुळे टपालसेवा कोलमडणार असल्याने नागरिकांना टपालापासून वंचित राहावे लागणार आहे.
ग्रामीणमधील डाकसेवकांना टपाल खात्यात सामावून घ्यावे, त्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सातव्या वेतन आयोगात समाविष्ट करून घेण्यात यावे, मरण पावलेल्या डाकसेवकांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर खात्यात नोकरी द्यावी, २५ टक्के पोस्टमनची पदे सेवाज्येष्ठतेनुसार डाकसेवकांमधून भरण्यात यावी, २५ टक्के एटीएसची पदे ग्रामीण डाकसेवकांमधून भरावी, बाहेरून भरती बंद करावी, ग्रामीण डाकसेवकांना १०, २०, ३० नुसार पदोन्नती द्यावी व त्यानुसार वेतन द्यावे, ५० टक्के महागाई भत्ता द्यावा, या मागण्यांसासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संघटना, नागपूरतर्फे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष एम.वाय. तिडके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
डाकसेवकाकडून रोजंदारीवर काम करून घेतले जाते. पाच तासाच्या ऐवजी आठ तास राबवले जाते. ग्रामीण भागात तर एकाच डाकसेवकाला पाच ते सहा गावात पत्र वाटावे लागते. असे असताना वेतन मात्र पाच ते सहा हजार रुपयेच मिळते. पाच वर्षांसाठी निवडून जाणाऱ्या आमदार, खासदारांना सेवानिवृत्ती वेतन मिळते. आम्हाला तीस वर्षे सेवा करूनही सेवानिवृत्ती मिळत नाही. याच मागण्यांसाठी गेल्या पन्नास वर्षांपासून लढा सुरू आहे. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे आता देशव्यापी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. केंद्र सरकारने आता तरी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी विनंतही तिडके यांनी केली.