डोंबिवली पश्चिमेतील महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोरील चौकात गेल्या आठवडय़ात महापालिका कामगारांनी खड्डा खणून एका बाजूने रस्ता बंद केला आहे. गेल्या महिनाभरात या चौकातील रस्ता पाच ते सहा वेळ खोदण्यात आला आहे. हा खड्डा कधी बुजवून रस्ता खुला होईल, या प्रतीक्षेत येथील रहिवाशी आहेत. खराब रस्त्यामुळे रिक्षाचालक महाराष्ट्रनगर, गोपीनाथ चौक भागात येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.  
कल्याण डोंबिवली शहराचे सिंगापूर व्हावे, असा विचार करून महापालिकेला नेहमीच मार्गदर्शन करणारे शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या प्रभागात हा भाग येतो. ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोरील संत ज्ञानेश्वर चौक ते भोईर वाडी दूरध्वनी कार्यालयपर्यंतचा रस्ता मातीचा झाला आहे.
या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. तरीही महापालिका अधिकारी हा रस्ता दुरुस्त करीत नसल्याने पादचारी, रिक्षेने प्रवास करणारे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. गेल्या सोमवारपासून संत ज्ञानेश्वर चौकात पुन्हा खड्डा खणून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे माती पावसाच्या पाण्यात इतरत्र वाहून जाते. या भागातून महापालिकेच्या जलवाहिन्या गेल्या आहेत.
जलवाहिनीत बिघाड होताच रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खणला जातो. मात्र दुरुस्तीचे काम तातडीने न करता ते संथगतीने केले जाते. त्यामुळे नागरिक, वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागतो.
या खड्डय़ाच्या बाजूला नवीन लोखंडी वाहिन्या आणून ठेवण्यात आल्या आहेत. या खड्डय़ाविषयी पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, काहीही माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.