‘खड्डे मुक्त’ ठाण्याची घोषणा करत रस्त्यांच्या कामांसाठी कोटय़वधी रुपयांच्या निविदा काढण्यात मग्न असलेल्या ठाणे महापालिकेला शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पडलेल्या मोठय़ा खड्डय़ांचा मात्र विसर पडला आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असताना अडीच वर्षांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अभियांत्रिकी विभागाने सुमारे २५० कोटी रुपयांचा बार उडविला होता. निवडणूक काळातच रस्त्यांवर डांबराचा मुलामा चढविण्यात आला. यापैकी अनेक रस्त्यांची आता चाळण झाली असून वागळे, वर्तकनगर, सावरकरनगर या परिसरात वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले होते. गुप्ता यांच्या आदेशामुळे अभियांत्रिकी विभागाने काही रस्त्यांची वरवर मलमपट्टी केली. मात्र, दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. महापालिकेने अडीच वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपयांचा खर्च करून शहरातील वेगवेगळ्या भागांतील डांबरी रस्त्यांचे नूतनीकरण केले. रस्त्यावर साजरे होणाऱ्या उत्सवांच्या विद्युत रोषणाई तसेच मंडप उभारणीसाठी हे नवे-कोरे रस्ते खोदू नयेत, असे आदेशही तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी काढले होते. या रस्त्यांवर किमान तीन वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत असा त्यांचा दावा होता. खड्डे पडलेच तर संबंधित कंत्राटदाराकडून ही कामे पुन्हा करून घेतली जातील, असा त्यांचा दंडक होता.
मात्र, गेल्या वर्षीच या रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. नवे-कोरे रस्ते उखडल्याचे चित्र जागोजागी दिसू लागले असून वाहनचालक आणि प्रवासी महापालिकेच्या नावाने खडे फोडू लागले आहेत. ठाण्याचा पूर्व परिसर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, कॅडबरी, नौपाडा, कळवा परिसरांतील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र आहे. हे खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्याची मागणी नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून होताच महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार, संबंधित विभागाने हे खड्डे भरले. गणेशोत्सवा दरम्यान झालेल्या जोरदार पावसात यापैकी काही रस्ते वाहून गेल्याचे आता दिसू लागले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
कामगार हॉस्पिटलचा रस्ता, कॅडबरी नाका, वर्तकनगर नाका, पोखरण रोड, तीनहातनाका परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. गोखले मार्ग, सरस्वती शाळेच्या परिसरातही नव्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यापैकी काही रस्त्यांवर कँाक्रीटचा मुलामा देण्यात येणार असल्याचे अभियांत्रिकी विभागातील सूत्रांनी सांगितले. डांबरी रस्त्यांवर वारंवार खड्डे पडतात. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते कँाक्रीटची केले जातील, असा दावाही या अधिकाऱ्याने वृत्तान्तशी बोलताना केला.
कामगार रस्त्याची चाळण
मुंबई-नाशिक महामार्गाला भेदणाऱ्या नितीन कंपनी जंक्शन येथून कामगार हॉस्पिटलमार्गे वागळे परिसरात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने वागळे परिसरातील ज्ञानेश्वरनगर, महात्मा फुलेनगर, कामगार हॉस्पिटल, जय भवानीनगर, यशोधननगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर आणि इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. दळणवळणाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो.  मलवाहिन्यांच्या कामासाठी कामगार हॉस्पिटलच्या परिसरातील रस्ता खोदण्यात आला आणि काम पूर्ण होताच बुजविण्यात आला. मात्र, तात्पुरती मलमपट्टी आणि सततची वाहतूक यामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले. गणेशोत्सवापूर्वी सिमेंटचा मुलामा चढवून हे खड्डे बुजविण्यात आले. पण, पावसामुळे हा मुलामा उखडल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचे दिसून येते.