News Flash

खड्डेमय कल्याण

दोन महिने पावसाने दडी मारल्याने इतके दिवस खड्डेमुक्त असलेल्या कल्याण डोंबिवलीची दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: वाताहत झाल्याचे चित्र

| July 29, 2014 06:02 am

दोन महिने पावसाने दडी मारल्याने इतके दिवस खड्डेमुक्त असलेल्या कल्याण डोंबिवलीची दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: वाताहत झाल्याचे चित्र असून शहरातील काँक्रीटच्या रस्त्याचा अपवाद वगळला तर प्रमुख रस्ते खड्डेमय बनले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात ही दोन्ही शहरे खड्डय़ात जातात, असा अनुभव आहे. या वर्षी पावसाचा जोर फारसा नव्हता. त्यामुळे खड्डेही नव्हते. दोन दिवसांत हे चित्र बदलले आहे.
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका, मलंगगड रस्ता, चक्कीनाका, विठ्ठलवाडी रस्ता, पश्चिमेत संतोषी माता रस्ता, मुरबाड रस्ता, पत्री पूल, डोंबिवलीत सुभाष रस्ता, उमेशनगर, वाहतूक कार्यालय चौक  या ठिकाणी दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे मोठाले खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आणि नंतर खड्डे बुजविण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरातील सात प्रभागांमध्ये ५० लाखांपासून ते ९९ लाखांच्या खर्चाच्या तरतुदी प्रशासनाने केल्या आहेत. दरवर्षी अशा प्रकारे खड्डे बुजविण्याच्या कामावर महापालिकेचे लक्षावधी रुपये खर्च होत असतात. महापालिका निवडणुकांपूर्वी या दोन्ही शहरांत जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे सत्ता द्या, शहर खड्डेमुक्त करतो, असे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांनी दिले होते. शिवसेना-भाजपची सत्ता येताच सुरुवातीच्या काही वर्षांत काँक्रीट रस्त्यांच्या कोटय़वधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. शहरातील प्रमुख रस्ते काँक्रीटचे होणार असल्यामुळे खड्डेमुक्त प्रवासाची हमी देण्यात आली. प्रत्यक्षात या रस्त्यांची कामे रडतखडत सुरू असून खड्डेमुक्त प्रवासाच्या प्रतीक्षेत अद्याप येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे महत्त्वाच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे दिसू लागल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. पावसाचा जोर कमी असल्यामुळे इतके दिवस खड्डय़ांची समस्या जाणवत नव्हती. मात्र, दोन दिवसांपासून जोर वाढताच रस्ते खड्डेमय झाल्याचे चित्र असून खड्डे बुजविण्यासाठी पावसाची उघडीप मिळण्याच्या प्रतीक्षेत कंत्राटदार आणि अधिकारी आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2014 6:02 am

Web Title: potholes in kalyan
Next Stories
1 पाण्याचा जपून वापर करणार
2 ठाण्यातील तरुणावर २४ तासांत एक कोटीचे कर्ज!
3 प्रशासकीय फेररचनेत कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडण्याचा पर्याय
Just Now!
X