जेएनपीटीला जोडणाऱ्या करळ पुलावर सध्या खड्डय़ांचे साम्राज पसरले आहे. दरवर्षी पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात येतो. पुन्हा पावसाळ्यात खड्डय़ातूनच प्रवास करण्याची वेळ वाहनचालकांवर येते. यातच या खड्डय़ांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. जेएनपीटीसह तीन बंदरांच्या उद्योगासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या पुलावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी जोर धरत आहे.
पुलावरील खड्डय़ांच्या विरोधात तीन वर्षांपूर्वी येथील राजकीय व सामाजिक संस्थांनी आंदोलन केलेले होते. त्यामुळे जेएनपीटीने दहा ते बारा कोटी रुपयांचा खर्च करीत पुलाच्या दुरुस्तीचे काम केलेले होते. पुलाच्या दुरुस्तीनंतर पुलावरील खड्डे भरण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून पुलावरील संपूर्ण थर काढून नव्याने डांबराचा थर टाकण्यात आलेला होता. तसेच पुलावरील वाढत्या वाहनांमुळे पुलाचे नुकसान होऊ नये म्हणून पुलाचे मजबूतीकरण करण्यात आलेले होते. मात्र तरी अवघ्या काही महिन्यांतच पुलाला खड्डे पडल्याने दुरुस्तीच्या दर्जासंदर्भात नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. या संदर्भात जेएनपीटीचे रस्तेदुरुस्ती विभागाचे अधिकारी ए. जी. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच पुलावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या वेळी तीन वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च करून पुन्हा खड्डे कसे, याबाबत त्यांना विचारणा केली असता, त्या वेळी आपण नव्हतो, असे उत्तर त्यांनी दिले; तर करळ पुलावरील अपघाताचा वाढता धोका पाहता लवकरात लवकर खड्डे भरावेत, अशी मागणी येथील प्रवाशांनी केली आहे.