सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील रस्ते चकाचक होत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र रस्त्यांची अवस्था बिकट आहे. डांबरीकरणाच्या नावाने काही रस्त्यांवर मुलामा देण्यात आलेला असला तरी हा मुलामा किती दिवस टिकेल, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये ज्याप्रमाणे रस्त्यांची जोडणी करण्यात आली आहे, त्याप्रमाणे ग्रामीण भागातही रस्ते जोडलेले असले तरी काही ठिकाणी डांबरीकरण तर काही ठिकाणी मुरूम अशी स्थिती असल्याने वाहनधारकांना कसरत करूनच वाहन चालवावे लागते.
ग्रामीण भागातील तुरळक अपवाद वगळता सर्वत्र परिस्थिती सारखीच दिसून येईल. त्यातही निफाड, सटाणा, चांदवड, मालेगाव, दिंडोरी या तालुक्यांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे. निफाड खेरवाडीमार्गे सायखेडा, सटाणा-नामपूर, सटाणा-ताहाराबाद, सटाणा दाभाडीमार्गे मालेगाव, चांदवड-मनमाड, दिंडोरी-मोहाडी ही काही उदाहरणे देता येतील. डांबरीकरणाच्या नावाखाली बारीक थर रस्त्यावर टाकला जातो. जो महिनाभरही टिकत नसल्याने रस्त्यावरील खडी पुन्हा बाहेर येते. बहुतेक रस्ते अरुंद असल्याने त्यांचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. परंतु, सर्वसामान्यांशी निगडित या समस्येकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष, ना प्रशासनाचे. अरुंद रस्त्यांमुळे समोरून चारचाकी वाहन येत असल्यास दुचाकीधारकालाही रस्त्याच्या खाली उतरल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी अशा रस्त्यांवर अपघात अधिक होतात. अलीकडेच नांदगाव-मनमाड रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्याआधी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ताहाराबाद नामपूरमार्गे मालेगाव हा एक वर्दळीचा मार्ग. दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्याच्या रुंदीकरणाची अत्यंत गरज असताना हा प्रश्न प्रलंबित आहे. अशीच स्थिती दिंडोरी मोहाडीमार्गे ओझर या रस्त्याची आहे.
ज्या राज्यातील रस्ते मजबूत त्या राज्याची प्रगती वेगवान असे म्हटले जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणून गुजरातकडे पाहिले जाते. गुजरातमधून सापुतारामार्गे महाराष्ट्रात येणारा आंतरराज्य मार्ग आहे. या मार्गाची गुजरातच्या हद्दीतील स्थिती आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील स्थिती बघितल्यावर फरक सहजपणे लक्षात येऊ शकेल. वणीहून सापुताऱ्यापर्यंतचा रस्ता म्हणजे खड्डय़ांचा आणि अरुंद. ठिकठिकाणी मुरूम टाकलेला. तर, सापुताऱ्यापुढील रस्ता एकदम चकचकीत. गुजरातकडून येणाऱ्या वाहनाने सापुताऱ्यापुढे सीमा ओलांडल्यावर खडखड सुरू झाली की, खुशाल समजावे आपण महाराष्ट्रात प्रवेश केला असे. किमान अशा महत्त्वपूर्ण रस्त्यांची दुरुस्ती तरी आवश्यक आहे. दिंडोरी-नाशिक दरम्यान असलेला टोलनाका जूनपासून बंद होणार आहे. मुळात इतकी वर्षे हा टोलनाका सुरूच का राहिला, हा प्रश्न आहे. रस्त्याची कोणतीही दुरस्ती नसताना आणि वाहनधारकांसाठी तो धड नसतानाही टोल घेण्यात येत आहे. स्थानिक मंडळींनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर काही राजकीय पदाधिकाऱ्यांना टोलमधून सवलत देण्याचे धोरण अवलंबिण्यात आल्याने विरोधाची धार बोथट झाली. त्यामुळे बिनभोबाटपणे टोल नाका सुरूच राहिला. नशिबाने तो आता बंद होणार असल्याने वाहनधारकांची विनाकारण टोल देण्यातून सुटका होईल.