सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने दुरुस्तीबाबत काखा वर केल्याने नव्याने विस्तार झालेला महामार्गच खड्डय़ात गेल्याचे चित्र आहे. तुर्भे, शिरवणे, उड्डाणपुलांवर तर खडी आणि खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून वाहने घसरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पण या मार्गावरील खड्डय़ाचे स्वरूप मोठे आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील एमआयडीसी भागातील रस्ते खड्डय़ात गेल्याचे दृश्य आहे. पाण्याला खाडीकडे जाण्यास मार्गच नसल्याने रस्त्यांवर तळी आणि झरे तयार झाले आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात सुमारे ४५० किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. पालिकेने रोड व्हिजनच्या नावाखाली काही मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. ते वगळता डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते मुसळधार पावसात उखडले आहेत. घणसोली, तळवली, नेरुळ या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा उतारा शोधण्यात आला आहे. ऐरोली सेक्टर आठ अमधील रायकर चौकातील सोसायटीसमोरील रस्त्याची खडी बाहेर आली आहे. हा रस्ता पावसाळ्यापूर्वी बनविण्यात आला असून हीच स्थिती वाशी येथील मॉर्डन कॉलेजच्या समोरील रस्त्याची आहे. सायन पनवेल महामार्गावर डांबरीकरण केलेल्या प्रत्येक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. वाहतूक पोलिसांनी व पालिकेने या रस्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. टोलचा निर्णय होत नसल्याने कंत्राटदाराने अधिक खर्च करण्याचे बंद केले असल्याचे समजते. त्यामुळे ही डागडुजी साबां विभाग करीत असून ती धिम्या गतीने सुरू आहे. तुर्भे येथील खड्डे हे चार-पाच इंच खोल असून वेगात आलेली वाहने या खड्डय़ामुळे शिरवणे व नेरुळ उड्डाणपुलावर आदळत आहेत. वाहनचालकांना यामुळे पाण्यात बोट चालविण्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. वाशी, पामबीच वळण, कळंबोली या चौकातही खड्डय़ांचे राज्य आहे. सायन- पनवेल मार्गावरील जड वाहतूक पाहता हा प्रश्न चर्चेला जात आहे. पण एमआयडीसी भागात खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात पालिकेने व एमएमआरडीएने सुरू केलेल्या उड्डाणपूल आणि सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यामुळे खड्डे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे एमआयडीसीत गाडी चालविणे कठीण झाले आहे, मात्र पालिका याकडे लक्ष देत नाही.