पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कंत्राटदारांची नियुक्ती वेळेत होऊ शकली नाही. परिणामी खड्डे बुजविण्याची धुरा पालिकेच्या विभाग कार्यालयातील कामगारांवर सोपविली. अयोग्य पद्धतीने भरलेले खड्डे पावसाच्या तडाख्यात उखडले आणि रस्ते पुन्हा खड्डेमय झाले. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या डांबरमिश्रीत खडीमुळे दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्येही वाढ झाली.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करण्याची मोहीम पालिका होती घेत होती. ही कामे कंत्राटदारांमार्फत केली जात होती. मात्र खड्डे बुजविणाऱ्या कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आल्यामुळे नव्या कंत्राटदारांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. मात्र प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेस झालेल्या दिरंगाईमुळे कंत्राटदारांची नियुक्ती वेळेवर होऊ शकली नाही. मेच्या अखेरीस खड्डे बुजविण्याच्या कामाच्या कंत्राटास स्थायी समितीची मंजूरी मिळाली आणि त्यानंतर गेल्या शनिवारी कंत्राटदारांच्या हाती कार्यादेश पडले. मात्र मुंबईतील खड्डय़ांबाबत ओरड सुरू झाल्यामुळे प्रशासनाने पालिकेच्या विभाग कार्यालयांतील कामगारांमार्फत खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.
विभाग कार्यालयांतील कामगारांनी दृष्टीस पडतील त्या खड्डय़ांमध्ये डांबरमिश्रीत खडी (कोल्डमिक्स) टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु वरवर टाकलेली डांबरमिश्रीत खडी पावसाच्या पहिल्याच तडाख्यात उखडली आणि रस्ते पुन्हा खड्डेमय झाले.
विभाग कार्यालयातील कामगारांनी अयोग्य पद्धतीने खड्डे बुजविल्याने डांबरमिश्रीत खडी अस्ताव्यस्त पसरली असून दुचाकीस्वारांची वाहने मुसळधार पावसात डांबरमिश्रीत खडीवरुन घसरू लागली आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी खड्डे बुजविण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. पावसाच्या तडाख्यात छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवर खड्डय़ांची संख्या वाढू लागली असून वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच पादचाऱ्यांनाहीचिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत आहे.
अयोग्य पद्धतीचा अवलंब
पालिकेच्या कामगारांनी डांबरमिश्रीत खडी टाकण्यापूर्वी खड्डा स्वच्छ करुन खरवडून घेणे गरजेचे होते. त्यानंतर डांबरमिश्रीत खडी टाकून त्यावरुन रोडरोलर फिरवायला हवा होता. परंतु यापैकी कोणतीच प्रक्रिया न करता कर्मचाऱ्यांनी खड्डय़ांमध्ये डांबरमिश्रीत खडी टाकली आणि ते निघून गेले. पहिल्याच पावसाच्या माऱ्यात खडी उखडली. तसेच सखलभागात पाणी साचल्यामुळे पालिकेने भरलेले खड्डे पुन्हा उखडले. खड्डे बुजविण्यासाठी अयोग्य पद्धतीचा वापर केल्यामुळे पालिकेच्या पैशांचाही अपव्यय झाल्याची टीका मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.